सांगली : नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यांमध्ये सांगली जिल्'ातील अनेक पर्यटक अकडले असून, आतापर्यंत त्यातील चौघांची नावे पुढे आली आहेत. दरम्यान, नेपाळ व उत्तर भारतामध्ये जिल्'ातून गेलेल्या व संपर्क तुटलेल्या नागरिकांसाठी शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातून नेपाळ व उत्तर भारतात अनेक पर्यटक गेले आहेत. काहीजण ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून, तर काही जण वैयक्तिरित्या गेले आहेत. वैयक्तिकरित्या एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी नेपाळमध्ये गेलेले सांगलीचे चार पर्यटक त्याचठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये अमोल अप्पासाहेब पाटील (रा. महसूल कॉलनी, शामरावनगर), सचिन उदगावे (वारणाली वसाहत), स्वप्नील कुंभारकर व त्यांची पत्नी मानसी कुंभारकर (रा. गव्हर्न्मेंट कॉलनी) यांचा समावेश आहे. यामधील कुंभारकर दाम्पत्याशी त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क झाला असून, इतर दोघांशी मात्र सायंकाळपर्यंत संपर्क झाला नव्हता. जिल्ह्यातून विशेषत: नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षामध्ये नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्र. ०२३३- २३७३०६३) शनिवारपासून उघडण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला असून, बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनीही बेपत्ता नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.