लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आजार अंगावर काढण्याची सवय...मला काही होत नाही ही बेफिकीर वृत्ती आणि अप्रशिक्षितांकडून घेतले जाणारे उपचार या त्रिसूत्रीमुळे रुग्ण कोविड सेंटरमध्ये पोहोचत आहे. श्वास न घेता येण्याने आलेली हतबलता पाहिली की वेळेत उपचार घेणं किती महत्त्वाचं आहे, हे समजतं. कोविड सेंटरच्या मांडवझळा सोसल्यानंतरच काळजी घेण्याचा शहाणपणा येते हे नक्की !
वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोना हा घरच्या घरी बरा होणारा आजार आहे. ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात राहून ठणठणीत होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आजार अंगावर काढण्याची सवय पुढे भयावह रूप धारण करत आहे. कुटुंबीयांना टेन्शन नको म्हणून चाचणीच न करणारे महाभाग पुढे एचआरसीटी स्कोअर वाढल्याने अगदी शेवटच्या क्षणी दाखल होतात. कोरोनाबरोबरची त्यांची झुंज अपयशी ठरते आणि घरातील कर्तामाणूस अक्षरश: डोळ्यादेखत निघून गेल्याची बोचरी सल आयुष्यभर या नातेवाइकांच्यात राहते.
वयस्क रुग्णांबरोबरच कमी वयातील रुग्णाच्या मृत्यूची बातमी अवघं सेंटर हदरवून टाकते. शेवटचं डोळे भरून पाहू द्या म्हणत नातेवाइकांचा आक्रोश काळजाच्या आरपार जातो. खूप धडपडून मिळविलेला बेड, उपलब्ध करून दिलेली औषधं, त्यासाठी केलेला खर्च आणि त्यामुळे लागलेली आस संपुष्टात आली की मग जाणीव होते आजार अंगावर न काढण्याचे आणि काळजी घेऊन वावरण्याचं महत्त्व !
चहा, जवेण अन् आवश्यक औषधही !
कलियुगात माणुसकी लुप्त पावली अशी ओरड खोटी ठरलेली या सेंटरच्या बाहेर पहायला मिळते. रुग्णांना घेऊन येणाऱ्या नातेवाइकांना जेवणासह त्यांच्या चहा नाष्ट्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. साताऱ्यातील खिदमत-ए-खल्क ग्रुपने चहाची, तर सारंग गुजर यांनी नाष्ट्याची जबाबदारी घेतली आहे. पाणी, ओआरएस आणि अन्य औषधे ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता लक्षात घेऊन वात्सल्य फाउंडेशनच्या शशिकांत पवार यांनी चक्क त्यांची चारचाकी जंबो कोविड सेंटरला दिली आहे. रुग्ण आणि नातेवाइकांसाठी पिण्याचे बाटलीबंद पाणी कन्हय्या राजपुरोहित देतात, तर ज्वेल ग्रुप, रोटरी सेव्हन हिल, सागर भोसले यांच्या वतीने दाखल होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्ण आणि नातेवाइकांसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे.
पावसात शेडचा, तर इतरवेळी लॉनचा आसरा !
रुग्णांना रांगेत लावून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नातेवाईक रुग्णांच्या नजरेच्या टप्प्यात जागा मिळेल तिथे उभे राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने रुग्णांबरोबर येणाऱ्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. दिवसा झाडाच्या सावलीत आणि रात्री सेंटरच्या लॉनवर बसणारे नातेवाईक पावसामुळे शेडचा आसरा घेत आहेत. पाऊस पडू लागल्यानंतर नातेवाइकांना खाली अंथरायला पुठ्ठे आणि चटई देण्याची माणुसकी सातारकरांनी दाखवली.
डॉ. अरुणा बर्गे यांची कार्यतत्परता
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी कोविड काळात लोकांमध्ये उतरून केलेले काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. स्वत:च्या मतदारसंघात स्वखर्चाने काडसिध्देश्वर कोविड सेंटर सुरू करून त्यांनी मतदारांना दिलासा. आमदार शिंदे ऑन फिल्ड काम करत असताना त्यांची बहीण डॉ. अरुणा बर्गे या रुग्णसेवेत व्यस्त आहेत. गुरुवारी रात्री १२.३० वाजता मतदारसंघातील अवघ्या २२ वर्षांच्या अत्यवस्थ रुग्णाला दाखल करताना क्षण भर ही ऑक्सिजन पुरवठा थांबता कामा नये म्हणून ठाण त्या मांडून बसतात. रुग्ण सुखरूप आत पोहोचल्यावर त्या निघून जातात.
कोट :
जंबो कोविड सेंटरबाहेर काम करताना भीषण आणि थक्क करणारे अनुभव हतबलता देतात. पण यातही माणुसकी म्हणून अविरत सेवा देणाऱ्यांकडे पाहून पुन्हा एकदा काम करण्याची ऊर्जा येते. आपल्यापरीने सेवा करत राहणं हा उद्देश असल्याने सेंटरमध्ये येणाऱ्या नातेवाइकांसह आतील कर्मचाऱ्यांशीही स्नेहबंध जुळला आहे.
- जयश्री पार्टे-शेलार, सामाजिक कार्यकर्त्या