रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील उसाच्या फडात पोरकी झालेली कोल्ह्याची चार पिले सापडली. दरम्यान, वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी चिमुकल्या कोल्ह्याच्या पिलांना गायीचे दूध बाटलीने पाजून त्यांचा आई बनून सांभाळ केला. मात्र, मादीचा पोट फुगून मृत्यू झाला आहे.
साप येथील भटकी नावाच्या शिवारात लक्ष्मण कदम यांच्या उसाची तोड सुरू असताना कोल्ह्याची चार पिले आढळून आली. जवळच मृतावस्थेत मादी सापडली. शेतकरी कदम यांनी याबाबतची माहिती वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली. रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख यांच्याबरोबर कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कोल्ह्याच्या चारी पिलांना ताब्यात घेतले. सुमारे आठ ते दहा दिवस वयाच्या पिलांच्या आईचा मृत्यू झाल्याने पिले उपाशीच होती. नवनाथ कोळेकर यांनी देशी गाईचे दूध बाटलीमध्ये भरून चिमुकल्या पिलांना स्वत: आई बनून दूध पाजून नवजीवन दिले. कोळेकर यांनी याबाबतची माहिती कोरेगावचे वनक्षेत्रपाल राजू आटोळे यांना दिली. लहान पिलांचे योग्य पद्धतीने संगोपन होण्यासाठी पिलांना कात्रज, पुणे येथील प्राणी अनाथालयात सोडण्यात यावी, अशी सूचना आटोळे यांनी दिली. रहिमतपूर येथे दोन दिवस पिलांचा सांभाळ केल्यानंतर चारही पिले प्राणी अनाथालयात सोडण्यात आली. दरम्यान, मादीचा पोट फुगून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याची माहिती पिंपरीचे पशुवैद्यकीय अधिकारी के. एस. दिसले यांनी दिली.
०५रहिमतपूर कोल्हा
फोटो : साप, ता. कोरेगाव येथील उसाच्या फडात सापडलेल्या कोल्ह्याच्या पिलांना वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दूध पाजून नवजीवन दिले. (छाया : जयदीप जाधव)