ढेबेवाडी विभागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिल्वर ओक, हेळा, आकोकार्पस, शिवन, बांबू, शिकेकाई, आवळा, शिसम, बाभुळ, जांभुळ, काजु, आकेशिया, नरक्या, अडळुसा, शतावरी आदी कितीतरी प्रकारच्या वनसंपदेने हा परिसर समृद्ध आहे. बिबट्यासह गवे, रानडुक्कर, अस्वल, ससे, अजगर, साळिंदर, भेकर आदी प्राण्यांचा आणि असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचा येथील जंगलात मुक्त संचार असतो. विविध अंगाने समृद्ध असलेली येथील वनसंपदा वणव्याच्या धगीने अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहे. वर्षागणिक वाढणारे वणव्याचे प्रमाण वनसंपत्तीच्या मुळावर उठल्याचे चित्र येथे आहे. वन विभाग व विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी वने वाचवण्यासाठी हाती घेतलेली वणवा निर्मूलनाची मोहीम येथे फारशी यशस्वी झालेली दिसत नाही. अशा प्रयत्नांपेक्षा लोकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असताना ती बदलण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कापणीनंतर गवत पेटवून दिल्याने पुन्हा जोमाने फुटवे येतात, गवताच्या बिया शेतात पसरत नाहीत. डुकरे घाबरुन पळुन जातात. शेत भाजून पिकांसाठी तयार होते, असे कितीतरी गैरसमज डोंगर भागात असल्याने शेतकऱ्यांनी डोंगर पेटवून देण्याचा लावलेला सपाटा आजतागायत कायम आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही उन्हाळ्यात परिसरात वणव्याची समस्या कायम असून, आठवड्यापासून प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता डोंगर पेटताना दिसत आहे. येथील वन विभागाचे कार्यालय पाटणला हलवल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. परिसरात जाळरेषा काढल्या जात असल्या तरी शेजारी असणाऱ्या मालकी क्षेत्रातून आग वन विभागाच्या हद्दीत पसरत आहे. त्यामुळे वणवा विझवताना वन कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. गत महिन्यापासून विभागात वणवा भडकत असल्याने वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, डी. डी. बोडके, अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे यांच्यासह अन्य कर्मचारी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करत आहेत; मात्र मुद्दाम पेटती काडी किंवा सिगारेटचे थोटूक गवतात फेकून पेटणारे जंगल मजा म्हणून बघणारे समाजकंटकही या परिसरात कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
- चौकट
‘फायर ब्लोअर’चे नियंत्रण
आग विझवण्यासाठी वन विभागाने फायर ब्लोअर यंत्राचा वापर केला जात आहे. वणवा विझवण्यासाठी हे यंत्र फारच उपयोगी असले तरी यंत्रासाठी लागणारे पेट्रोल आणि त्यासाठी येणारा खर्च न परवडणारा असल्याने शासनाकडून त्यासाठी खर्च मिळत नसल्याने वन विभागासाठी हा विषय डोकेदुखी ठरत आहे.
- कोट
विभागात रोज कुठे ना कुठे वणवा भडकताना दिसत आहे. या वणव्यात दुर्मीळ वनौषधी वनस्पती जळून खाक होत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे, हे गंभीर आहे. वन विभाग आपले काम चोख बजावत आहे; पण निसर्गाने जे वैभव आपल्याला दिले आहे ते आपण जपले पाहिजे.
- हिंदूराव पाटील, प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
फोटो : ०७केआरडी०४
कॅप्शन : ढेबेवाडी विभागात डोंगरांना वणवा लावला जात असल्याने वनसंपत्ती जळून खाक होत आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)