संजय पाटीलकऱ्हाड : मातृत्व केवळ माणसांमध्ये नव्हे तर वन्यजीवांमध्येही तेवढंच ओतप्रोत भरलेलं असतं. कऱ्हाड तालुक्यात गत वर्षभरात मुक्या जीवांतील हा मातृत्वाचा झरा अनेकवेळा पाहायला मिळाला. ताटातूट झालेली वन्यजीवांची २८ पिल्लं वनविभाग आणि ‘रेस्क्यू टीम’मुळे त्यांच्या आईच्या कुशीत पुन्हा विसावली. आई आणि पिल्लांच्या पुनर्भेटीचा हा सुखद क्षण ‘आईपण भारी देवा’ याचीच जाणीव करुन देणारा ठरला.कऱ्हाड तालुक्याच्या प्रादेशिक वनहद्दीत मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर आहे. सध्या पिकांची काढणी झाल्यामुळे शिवार रिकामे होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी इतरत्र निवारा शोधत आहेत. अशातच काही वन्यप्राण्यांच्या पिल्लांची त्यांच्या आईपासून ताटातूट झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तालुक्यात गत वर्षभरात पंधरा ठिकाणी अशा घटना समोर आल्या. बिबट्या, उदमांजर, वाघाटीसह अन्य प्राण्यांची तब्बल २८ पिल्ले बेवारस स्थितीत शिवारात आढळून आली. वनविभाग आणि ‘ वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीम’ने या पिल्लांची त्यांच्या आईशी पुनर्भेट घडवून आणली.
.. येथे घडली पुनर्भेट
- २ बिबट्याची बछडी : जखिणवाडी
- १ बिबट्याचा बछडा : तांबवे
- १ बिबट्याचा बछडा : नांदगाव
- २ रानमांजराची पिल्ले : नांदगाव
- ३ रानमांजराची पिल्ले : धोंडेवाडी
- २ बिबट्याची बछडी : मालखेड
- २ बिबट्याची बछडी : मालखेड
- २ वाघाटाची पिल्ले : काले
- ४ उदमांजराची पिल्ले : काले
- २ बिबट्याची बछडी : हिंगनोळे
- ३ वाघाटीची पिल्ले : हिंगनोळे
- १ उदमांजर पिल्लू : तांबवे
- १ बिबट्याचा बछडा : नारळवाडी
- २ बिबट्याची बछडी : नांदगाव
वनविभाग, रेस्क्यू टीमने काय केले?
- वन्यजीवांची पिल्ले सापडल्यानंतर त्यांना तेथेच कॅरेटमध्ये ठेवले.
- सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात चोवीस तास कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला.
- पिल्लांच्या परिसरात वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत होते.
- मादीने पिल्लांना सोबत नेल्याची खात्री होईपर्यंत पिल्लांवर लक्ष ठेवले.
बिबट्या मादीपासून त्याचे पिल्लू दुरावले तर ती मादी आक्रमक होण्याची दाट शक्यता असते. पिल्लू दुरावले तर ती हल्ला करु शकते. तसेच ते पिल्लूही त्याच्या आईशिवाय जास्त काळ एकटे जगू शकत नाही. त्यामुळे त्यांची पुनर्भेट होण्यासाठी वनविभाग आणि ‘वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीम’ने यशस्वी प्रयत्न केले आहेत. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक
एखाद्या वन्यप्राण्याचे पिल्लू त्याच्यापासून दुरावले तर त्या पिल्लाच्या जगण्यात असंख्य अडचणी निर्माण होतात. तसेच त्याची आईही त्या पिल्लाच्या शोधात भटकत राहते. कऱ्हाड तालुक्यात अशी ताटातूट झालेली पिल्ले आढळून आली होती. त्यांची त्यांच्या आईशी पुनर्भेट घडवून आणली. - ललिता पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी, कऱ्हाड