सातारा : सातारा जिल्ह्यातील परसबागेचे गाव म्हणून नावारुपास आलेल्या जावळी तालुक्यातील पुनर्वसन पानस गावाला परदेशी ३० पाहुण्यांनी अभ्यास दाैऱ्यांतर्गत भेट दिली. गावातील परसबागेची माहिती घेऊन तसेच पाहुणाचाराने संबंधित पाहुणे भारावून गेले. तर या पाहुण्यांमुळेच गावातील सेंद्रीय परसबागेचे कामही जगातील १० देशापर्यंततरी पोहोचणार आहे.जावळी तालुक्यात पुनर्वसन पानस गाव आहे. अल्पावधीतच हे गाव परसबागेचे म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध झालेले आहे. या गावातील माहिती घेण्यासाठी गावोगावचे नागरिक तसेच संस्था येतात. येथील माहितीवर संबंधित आपल्या गावांतही अशीच मोहीम राबवत असतात. नुकतीच या गावाला परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन माहिती घेतली.ग्रामपरी संस्था, पानस ग्रामपंचायत आणि गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच पानसमधील काळभैरवनाथ ट्रस्टच्या सहकार्याने परदेशी पाहुण्यांचा हा दाैरा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे ३० परदेशी पाहुणे होते. भारतीय ग्रामीण लोकजीवन, शिक्षण पद्धतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी ते आलेले आहेत. या दाैऱ्यात त्यांनी पुनर्वसन पानस गावालाही भेट दिली. तसेच त्यांचा हा दाैराही यशस्वीपणे पार पडला. परदेशी पाहुण्यांमुळे पानस गावातील सेंद्रिय परसबागेचे उल्लेखनीय काम आता जगभरातील किमान १० देशांपर्यंत पोहोचणार आहे.
३५ हून अधिक सेंद्रीय परसबागा..पानस गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांच्या सहकार्यातून शाळा, अंगणवाडी तसेच गावामध्ये ३५ हून अधिक सेंद्रिय परसबागा तयार झालेल्या आहेत. अत्यंत उल्लेखनीय आणि दखलपात्र असे काम या पानस गावात झाले आहे. यामुळे गावातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचा सकस आहार, पौष्टिक सेंद्रिय भाजीपाल्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे.
१० देशातील परदेशी शेतकरी, शिक्षण तज्ज्ञ
पानसमधील कामाची पाहणी करण्यासाठी अमेरिका, सिंगापूर, थायलंड, आफ्रिका, युगांडा, इंग्लंड, केनिया, इथोपिया, फ्रान्स, सैबेरिया या १० देशातील ३० परदेशी शेतकरी, शिक्षण तज्ज्ञ आले होते. यावेळी ग्रामपरी संस्थेचे समन्वयक, ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते. उपस्थितांना परदेशी पाहुण्यांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याची संधी मिळाली.