शेखर जाधव वडूज : खटाव तालुक्याची जलदायनी असलेली येरळानदी गत आठवड्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे दूथडी भरून वाहू लागली आहे . त्यामुळे तालुक्याला वरदान ठरणारा येरळा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून वाढत्या पाणीपातळीमुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे . सलग चार वर्ष मान्सून मध्ये पडलेल्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरत आहे. मात्र खटाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यादांच मे महिन्यात तलाव पुर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने शेतकरी वर्गासह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
उन्हाळ्यात पहिल्यादांच मान्सुनपूर्व पावसामुळे येरळा नदीला पूर येऊन तलाव्याच्या सांडव्यांवरून पाणी वाहू लागले आहे . तालुक्यातील पूर्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या विसर्गामुळे बनपुरी गावापासून येरळेचे नदीपात्र लवकरच प्रवाहित होणार असल्याने नदी तीरावरच्या गावांतील भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. सलग पाच वर्ष हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असून, दुष्काळी जनतेला निसर्गाच्या या कृपेमुळे मोठा आधार मिळाला .
दुष्काळी भागावर वरूणराजाची कृपा दिसल्याने शेतकऱ्यांसह गावकरी ही समाधानी असल्याचे दिसून येत आहेत. सुमारे सव्वा टीएमसी क्षमता असलेल्या तलाव्याचे पाणी सांडव्यावरून वाहत असल्याने परिसरात मच्छिमारी ला उधाण आले आहे. तर खटाव तालुक्यातील सुमारे सत्तर गावांना येरळवाडीचा तलाव हा दुष्काळी जनतेला पाणीपुरवठा करणारे प्रमुख स्रोत आहे. याच तलावावर वडूज, खातवळ,गुरसाळे, नढवळ, येरळवाडी, अंबवडे आदी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तर तलावा शेजारील शेती व बनपुरी टॅफर फिडिंग पाइंटलाही येरळवाडीतून पाणीपुरवठा होतो.
वरूणराजाने तालुक्याच्या पश्चिम भागासह तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाने आठवड्यात चांगली हजेरी लावल्याने तलावात पाणीसाठ्यात वाढ होऊन हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्याच्या पूर्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्यास मदत झाली आहे.हे पाणी सांगली जिल्ह्यात जावून तेथील नदीपात्रात मिसळते. नदी तीरावरच्या अंबवडे, गोरेगाव, मोराळे गुंडेवाडी व चितळी या गावातील भूजलसाठा वाढण्यास एकप्रकारे मदत होत आहे. दुष्काळात गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्रातील घेतलेले विहिरी व बंधारे कमी- अधिक प्रमाणात भरले असून, येरळेच्या पाण्याने ते पूर्ण ओसांडून वाहणार आहेत. याही वर्षी नदीचे पात्र प्रवाहित झाल्याने व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने वाढलेली पाणीपातळी पाहण्यासाठी गावोगावचे ग्रामस्थ , युवक - युवती हजेरी लावत आहेत.
येरळवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात चौफेर ऊस शेतीचे प्रमाण वाढलेले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरीने शेती पाण्याचाही प्रश्न मिटल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.तर तालुक्यातील पश्चिम भागातील छोटे-मोठे तलाव,ओढे-नाले खळखळून ओसांडत असल्याने यैरळा पात्रावरील बंधारे परिसरात मच्छिमारी होताना दिसून येत आहे.
दरम्यान मागील तीन , चार दिवसात पुसेगाव, खटाव,खातगुण परिसरात जोरात पाऊस झालेमुळे तसेच नेर तलावही फूल भरल्यामुळे नदीला पूर आला आहे . वडूज येथील केटी बंधाऱ्या वरून पाणी वाहिल्याने येरळा नदी काठावर स्मशानभूमी व म्हसोबाचा मळा परिसर रस्तावर पाणी आल्याने हा रस्ता काही काळ ठप्प होता. सद्यस्थितीत भिजपाऊस सुरू राहिल्याने कातरखटाव , बनपूरी , गणेशवाडी , डाळमोडी भागातून नदी ओढे यांना पूर येऊन ते पाणी नदीच्या पात्रात मिसळत आहे.
येरळवाडी मध्य प्रकल्पाची साठवण क्षमता ३२.८० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मुख्य धरण हे मातीचे असून त्याची लांबी १८२५ मीटर आहे.२९० मीटर द्वार विरहित सांडवा आहे.एकूण धरणाची लांबी २११५ मीटर आहे. एकूण साठवण क्षमतेपैकी मृत पाणीसाठा १३.२० द.ल.घ.मी व उपयुक्त पाणीसाठा १९.६० द.ल.घ.मी.असा आहे. धरणाचे ठिकाण अवर्षण प्रवण क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी मागणी कायम असते .सिंचन क्षमता ४०३७ हेक्टर क्षेत्र असून उजव्या कालव्यावरून २४६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली तर डाव्या कालव्यावरून १५७७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. पिण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे वडूज,अंबवडे व कातरखटाव आदींसह काही गावांना तर काही प्रमाणात औद्योगिक प्रयोजनार्थ पाणी उचलण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. टंचाई कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्था व महसूल यंत्रणे मार्फत खटाव तालुक्यातील खेडेगावांना टँकर द्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असतो.