सातारा : जिल्ह्यामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने कारवाई करीत सुमारे ३० हजार रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत केले
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील पंताचा गोट परिसरात असणाऱ्या साई पान शॉप आणि गुरुवार पेठ येथे असणाऱ्या हाशीम मुनाफ शेख यांच्या पान शॉपमधून १६ हजार रुपयांचा गुटखा, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यात आले. याबाबतची तक्रार अन्न औषध प्रशासनाचे इम्रान समीर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. हवालदार कारळे हे तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, १ एप्रिल उंब्रज (ता. कराड) येथे इजाज इलाही मुल्ला (रा. मोमीन मोहल्ला, उंब्रज), यांच्या राहत्या घरासमोर ४ हजार ५०९ रुपयांचे मादक पदार्थ आढळून आल्याने अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी राजेंद्र शहा यांनी इजाज इलाही मुल्ला आणि जाकीर पटेल (रा. कराड) या दोघांविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तिसऱ्या घटनेत, २ एप्रिल रोजी वडूथ (ता. सातारा) येथे ८ हजार ४६३ रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी यांचा परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे साठा करून ठेवल्याने प्रथमेश शिंदे (वय २१), प्रताप गोरे (वय ५५), अरुण साबळे (वय ६२, तिघेही रा. वडूथ, ता. सातारा) यांच्याविरोधात अन्न औषध प्रशासनाचे कर्मचारी विकास सोनवणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास पो.ह. कदम हे करीत आहेत.