सातारा : स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराला राज्यभरातील हजारो पर्यटकांनी रविवारी भेट दिली. फुलांना मुख्य हंगाम अजून सुरू झाला नसला तरी पुष्प पठार पर्यटकांनी बहरून गेले आहे. एकाच दिवसात तब्बल एक हजार ते बाराशे वाहने पठारावर दाखल झाल्याने जागोजागी वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच वाहनांच्याही दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. कास पठार हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. येथील फुले देशभरातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी सुरू होते. मात्र, सध्या सलग सुट्यांमुळे कास पठार व तलावाला यात्रेचे स्वरूप आले आहे. रविवारी एकाच दिवशी राज्यासह परराज्यातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. कास पठारावरील फुले उमलण्यासाठी मुबलक सूर्यप्रकाशाची गरज आहे. मात्र, धुके व पावसामुळे फुलांचा हंगाम लांबणीवर पडला आहे. सध्या चार ते पाच प्रकारची फुले उमलली असून, पर्यटक या फुलांसोबत सेल्फीसह फोटोसेशन करताना दिसून आले. सोमवारीही सुटी असल्याने पर्यटकांची संख्या आणखीन वाढणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
फुले उमलण्यापूर्वीच कास पर्यटकांनी फुलले
By admin | Updated: August 15, 2016 00:47 IST