नितीन काळेल सातारा : दुष्काळी पट्ट्याचा वेगळा माणदेश जिल्हा होण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. असा जिल्हा झाल्यास स्वागत करु. तसेच नवीन पालकमंत्र्यांच्या हस्तेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील मानीनी जत्रेतील महिला बचत गट स्टाॅलच्या पाहणीनंतर मंत्री गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महिला बचत गटाविषयी माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरेही दिली. ‘लाडकी बहीण’च्या प्रश्नावर त्यांनी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. पाच वर्षे बंद होणार नाही. बहिणींना जानेवारीचा हप्ता २६ तारखेपूर्वी मिळेल असे सांगितले. तर माणदेश जिल्हा निर्मिती प्रश्नाबाबत मंत्री गोरे म्हणाले, माणदेश जिल्ह्याचा प्रस्ताव समोर आलेला नाही. दुष्काळी पट्ट्याचा माणदेश जिल्हा व्हावा, अशी काहींच्या कल्पना आहेत. पण, तशी कार्यवाही झालेली नाही. माणदेश जिल्हा झाला तर स्वागत करेन. पण, दुष्काळी भाग एकत्र करुन विकसित जिल्हा होईल असे समजायचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.झेडपीच्या मोक्याच्या जागांकडे अनेकांचे लक्ष !
कार्यक्रमात मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक जागा आहेत. याची माहिती घेत असून तेथे काय करता येते का ते पाहिले जाईल असे स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा आहेत. त्याच्याकडे अनेकांचे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गोरे यांचा रोख नेमका कोणाकडे ? याविषयी कार्यक्रमस्थळी जोरदार चर्चा सुरू होती.
नायगावात बचत गटांसाठी निवासी प्रशिक्षण...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव या जन्मगावी १२५ कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभे राहणार आहे. तेथे उमेद अंतर्गत गटातील महिलांचे निवासी प्रशिक्षण सुरू होणार आहे, असेही मंत्री गोरे यांनी सभेतील मार्गदर्शनादरम्यान सांगितले.