लोणंद : लोणंदनजीक असणाऱ्या बाळुपाटलाचीवाडी, ता. खंडाळा गावातील यादव वस्तीवर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास लांडग्याने धुमाकूळ घालून पाच महिला व दोन गार्इंना चावा घेऊन जखमी केले. लांडग्याच्या अचानक हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी लांडग्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला असून, लोणंद परिसरातील बाळूपाटलाचीवाडी, बावकलवाडी, मरीआईचीवाडी, पिंपरे बुद्रुक या गावांत या लांडग्याचा वावर आहे. वनखात्याने या लांडग्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.बाळूपाटलाचीवाडी गावाच्या हद्दीतील यादव वस्तीवरील महिला शेतात काम करीत असताना लांडग्याने महिलांवर हल्ला करून जखमी केले. त्यामध्ये शोभा व्यंकट धुमाळ (वय. ४०) व भाग्यश्री नानासो धायगुडे (४१) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचार केले.या लांडग्याने आणखी तीन महिलांना चावा घेऊन एका गाईसह वासरासही चावा घेत जखमी केले. चावा घेत याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आरडाओरडा करून लांडग्याला पळवून लावले. परंतु हा लांडगा या परिसरातील गावातच वास्तव असण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लांडग्याचा वनखात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे. (वार्ताहर)
लांडग्याच्या हल्ल्यात पाच महिला जखमी
By admin | Updated: May 15, 2015 23:39 IST