सातारा : गतविधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत सरासरी मतदान वाढले आहे. यावर्षी मतदानाची टक्केवारी पाच टक्क्याने वाढली असून, एकूण टक्केवारी ६७.२४ टक्के इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी निश्चित नाही. यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले होते. संपर्कहीन असणाऱ्या मतदान केंद्राची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाली नसल्यामुळे अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती. दरम्यान, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे येथील निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील संपूर्ण मतदानप्रक्रिया संपल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नियोजन भवनात पत्रकार परिषद घेतली आणि जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान झाले. आठही मतदारसंघांत ८७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये फलटण १४, वाई १०, कोरेगाव ८, माण १२, कऱ्हाड उत्तर ७, कऱ्हाड दक्षिण १२, पाटण १५, सातारा विधानसभा मतदारसंघातील ९ उमेदवारांचा समावेश होता. एकूण मतदान केंद्रांची संख्या २,९५0 इतकी होती. यापैकी तेरा मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग तर पाच मतदान केंद्रे आदर्श मॉडेल म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी साता सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला होता. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत १८.६५ टक्के मतदान झाले. पाटण विधानसभा मतदारसंघात मात्र मतदानाचा वेग सर्वाधिक होता. यानंतर मात्र जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातही मतदान वाढतच गेले. बारानंतर मात्र कमी झाले. पुन्हा दुपारी तीननंतर मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ५९.६0 टक्के मतदान झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मतदानादरम्यान कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस दलही ठिकठिकाणी सतर्क होते. सर्व कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर वेळेत पोहोचले होते. (प्रतिनिधी)बेवकास्टिंगमध्ये अडथळेजिल्ह्यात यावेळी पहिल्यांदाच वाई विधानसभा मतदारसंघातील तेरा मतदान केंद्रांवर बेवकास्टिंग झाले. परिणामी ही मतदान केंदे्र ‘लाईव्ह’ होती. वेबकास्टिंगमुळे ‘जी-मेल’ आणि ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून जगभरात कोठेही एका क्लिकवर संपूर्ण मतदानप्रक्रिया दिसणार होती. मात्र, यामध्ये काहीदा अडथळे आले. तरीही राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने हे अडथळे दूर करत मतदान केंद्रावरील प्रक्रिया ‘लाईव्ह’ करण्यात यश आले.अठरा ठिकाणीईव्हीएम बदललीजिल्ह्यात अठरा मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे तेथे नवीन मतदान यंत्रे दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. २००९ मध्ये जी मतदान यंत्रे वापरण्यात आली, त्याचाच वापर यावेळी करण्यात आला. काही मतदान यंत्रांच्या बॅटरी खराब झाल्या असल्याची भीती जिल्हा प्रशासनाला होती. मात्र, त्यावर उपाययोजना म्हणून मुंबई आणि पुणे येथून ८०० अतिरिक्त बॅटरी मागवून घेतल्या होत्या.
गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के मतदान वाढले
By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST