वाई : वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात रेशीम केंद्राजवळ महाबळेश्वरहून पुण्याकडे निघालेली व पुण्याहून महाबळेश्वरला येत असलेली कार (एमएच १२ एफझेड १५१९) व (एमएच १२ एलडी ८१४०) या गाड्यांची समोरासमोर धडक झाली़ यामध्ये कारचालक अविनाश दिवाळे (वय ३२) याच्यासह पुण्यातील पाचजण जखमी झाले. वृद्धेची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्या असून, पाचगणी-महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे पसरणी घाटात वाहनांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी दुपारी ओव्हरटेक करण्याच्या या दोन वाहनांची धडक बसली. यामध्ये कारचालक दिवाळे याच्यासह छाया काळभोर (६२), चेतन काळभोर, प्रशांत सोनवले हे जखमी झाले आहेत़ छाया काळभोर यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघातामुळे घाटातील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. यामुळे शेकडो वाहने अडकून पडली होती. वाहनांचा दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली व जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़ (वार्ताहर)
कार धडकेत पाचजण जखमी
By admin | Updated: November 15, 2015 01:04 IST