लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने, पालिका प्रशासनाने शहरातील सर्व मंडई बंद केल्या असून, विक्रेत्यांना घरपोच भाजी विक्रीचा परवाना दिला जाणार आहे. मात्र, हा परवाना मिळविण्यासाठी विक्रेत्यांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र पालिकेला देणे बंधनकारक आहे.
सातारा शहरात चार मोठ्या मंडई आहेत. या मंडईतील भाजी विक्रेत्यांची संख्या सुमारे ३५० इतकी आहे. भाजी ही दैनंदिन गरज असल्याने सर्वच मंंडईत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. या गर्दीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याने, प्रशासानाने प्रारंभी सर्व विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, विक्रेत्यांकडून म्हणावा असा प्रतिसाद पालिकेला मिळाला नाही.
दरम्यान, राजवाडा मंडईतील सात विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. पालिका प्रशासनाने राजवाडा मंडईसह शहरातील सर्वच मंडई तातडीने बंद केल्या. विक्रेत्यांनी पालिकेकडून परवाना घेऊन घरपोच भाजीविक्री करावी, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. यासाठी संबंधित विक्रेत्यांना आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे, तसेच कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र पालिकेच्या कोरोना कक्षात जमा करावे लागणार आहे. अशा विक्रेत्यांनाच पालिका भाजीविक्रीचा परवाना देणार आहे. सोमवारी दोन विक्रेत्यांची पालिकेकडे नोंद झाली आहे.
(कोट)
भाजीविक्रेते व नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील मंडई बंद ठेवल्या आहेत. मात्र, विक्रेत्यांना घरपोच भाजी विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. संबंधितांची कोरोना चाचणी करून पालिकेत परवाना मिळविण्यासाठी नोंदणी करावी. बाजारपेठेतील गर्दी कमी झाली, तरच संक्रमण रोखण्यास मदत होईल.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी