कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथे प्रथमच डिजिटल ग्रामसभा पार पडली. संगणक व प्रोजेक्टरच्या साह्याने ग्रामस्थांना योजनांची तसेच नवीन प्रकल्पांची माहिती देण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक शंकर पवार होते. सरपंच सुरेखा डुबल, उपसरपंच दयानंद पवार, तंटामुक्ती अध्यक्ष जे. के. पाटील, माजी सरपंच बापूराव पवार, कृषी पर्यवेक्षक एस. डी. फकीर, पशुवैक्षकीय पर्यवेक्षक डॉ. एस. के. शेगर आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकास अधिकारी ए. के. पाटील यांनी संगणकाच्या माध्यमातून अनेक विषय ग्रामस्थांसमोर मांडले. शासकीय योजनेची माहिती तसेच विकासकामे, समस्यांचे चित्रीकरण करून ते एल. सी. डी. प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आले. यावेळी विकासाकामांसदर्भात ग्रामस्थांनी अनेक प्रश्न मांडले.डोंगरी विभाग विकासामध्ये गावाचा समावेश करण्यात यावा, जलशिवार योजनेची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात यावी आदींसह अनेक विषयांचे ठराव करण्यात आले. शामराव पवार यांनी प्रास्ताविक केले. नीलेश पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर) ग्रामसभा मैदानात---वडोली निळेश्वर येथे आजपर्यंतच्या ग्रामसभा हॉलमध्ये घेण्यात आल्या; मात्र ही पहिलीच सभा मैदानात घेण्यात आली. विकासाविषयी तसेच शासकीय योजनेची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्याने इतर गावांना ही ग्रामसभा आदर्शवत ठरणार आहे.लोकशाहीमध्ये ग्रामसभेला महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामस्थांच्या समस्यांविषयी चर्चा ग्रामसभेत होते. ग्रामसभेचे महत्त्व ग्रामस्थांच्या लक्षात यावे, हा डिजिटल ग्रामसभेचा उद्देश होता. तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे ग्रामसभेविषयी लोकांमध्ये आवड निर्माण होण्यास मदत होईल. - दयानंद पवार, उपसरपंच, वडोली निळेश्वर
वडोली निळेश्वरला पहिली डिजिटल ग्रामसभा
By admin | Updated: October 9, 2015 23:40 IST