सातारा : सातारा पोलीस दलाने पोलीस कंट्रोल व्हॅन (पीसीआर) सुरू केल्याने आता गैरप्रकारांवर करडी नजर राहणार आहे. कोणत्याही घटनेची माहिती मिळताच पोलिसांची ही यंत्रणा अगदी तत्काळ घटनास्थळी पोहोचणार असल्यामुळे दंगा नियंत्रण असो, अथवा अन्य कोणत्याही अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.महाराष्ट्र पोलीस दलाच्या उन्नत दिनानिमित्त सातारा पोलीस दलाने ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू केले आहे. त्याचबरोबर ‘पोलीस कंट्रोल रूम व्हॅन’ तथा ‘पीसीआर’ पोलीस दलात दाखल झाल्या.दरम्यान, यावेळी शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, नगराध्यक्ष सचिन सारस, डॉ. हमीद दाभोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ‘पोलिसांचे कामकाज कसे चालते, याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते. त्याचबरोबर नागरिकांशी संबंध वृद्धिंगत व्हावेत, या हेतूने पोलीस उन्नत दिनाचे औचित्य साधून या सप्ताहात विविध उपक्रम घेतले जातात. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ‘पीसीआर’ आजपासून सुरू केले आहे. पोलिसांमार्फत विविध दाखले देण्यात येत असतात. नागरिकांकडून विविध तक्रार अर्ज येतात. त्यासाठी ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू केले आहे. पोलीस उपाधीक्षक मनोज पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. पोलीस उपाधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी आभार मानले. यावेळी विविध अधिकारी, पोलीस अधिकारी, नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रत्येकजण पोलीस पोलीस हा गणवेशातील नागरिक तर नागरिक हा साध्या वेशातील पोलीस असतो, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, ‘बंदोबस्ताच्या निमित्ताने पोलीस सदैव रस्त्यावर असतो. त्यामुळेच आपण निर्धास्तपणे घरी असतो. याचे भान आपण ठेवले पाहिजे. सामान्य नागरिक म्हणून आपणही आपली जबबादारी पार पाडली पाहिजे. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी, त्याचबरोबर गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि दोषींना शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून आपण पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.’
पोलीस दलात चालती-बोलती यंत्रणा दाखल
By admin | Updated: January 3, 2015 00:01 IST