पळशी : ‘माण-खटावसाठी कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून, यापुढेही माण-खटावच्या जनतेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. व त्यांच्या पाठीशी मी सदैव राहणार आहे. वडिलांच्या निधनानंतर मी रडत बसले नाही, तर आता माझा पिंड हा लढण्याचा आहे,’ असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. माण तालुक्यातील पळशी येथे आयोजित केलेल्या माणगंगा नदीवरील बंधारा व विकास सेवा सोसायटीच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, भाजपचे प्रा. सदाशिव खाडे, डॉ. पप्पू खाडे, सूर्यकांत खाडे, प्रमोद खाडे उपस्थित होते.मुंडे म्हणाल्या, ‘माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांतील जनतेने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना खूप प्रेम दिले आहे. याची जाण त्यांना कायम होती. त्यांचे ते स्वप्न अपुरे राहिले. माण-खटावच्या जनतेसाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच या दोन्ही तालुक्यांत बंधारे बांधून त्यातून जलक्रांती घडविण्यासाठी कोट्यवधी निधी दिला आहे, यापुढेही देणार आहे.’ यावेळी भाजपचे माण तालुका सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे यांनी माणमध्ये शंभर कॉटचे अद्ययावत हॉस्पिटल व्हावे, अशी मागणी करत त्यांनी सुरू करत असलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे योजनेंतर्गत अवघ्या १५ हजारांत अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांच्या म्हसवड येथील हॉस्पिटलमध्ये करणार असल्याचे सांगितले.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘पळशी भागाला टेंभूचे पाणी मिळाले, तर येथील बळीराजाला लाभ होईल. टेंभूचे पाणी राणंदच्या तलावात व तेथून जाशीच्या तलावात पाणी आल्यास पळशीचे नंदनवन होईल.’यावेळी उद्धव खाडे, अमोल खाडे, महादेव खाडे, विशाल नाकाडे, चंद्रहार खाडे, ग्रामपंचायतीचे सदस्य, धामणी, ढाकणी, झाशी, पिंपरी, पडळ, दानकुळ, तडवळे, मांडवे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)डॉ. राजेंद्र खाडे म्हणाले, माणच्या आमदारांनी उरमोडीचे पाणी आणल्याचे सांगून व फोटोसेशन करून जनतेची दिशाभूल केली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी माणमधील बंधाऱ्यांसाठी ६० कोटींचा निधी दिला असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. माणचे आमदार ती कामे मीच आणल्याचे जनतेला सांगत आहेत. आमदारांनी सरकार कोणाचे आहे? याचा आतातरी विचार करावा.
माझा पिंड लढण्याचा : पंकजा मुंडे-
By admin | Updated: April 22, 2016 22:23 IST