वडूज : तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूज शहरातील बाजार पटांगणातील जुने स्वच्छतागृह पाडून त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह बांधण्याचे नगरपंचायतीचे नियोजन आहे. मात्र, हे नियोजन कोलमडल्याने बाजारहाटासाठी येणारे ग्रामस्थ, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांची स्वच्छतागृहाविना कुचंबणा होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना लघुशंकेसाठी चक्क एक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
वडूज शहरातील दैनंदिन मंडई व आठवडा बाजार तालुक्यात मोठ्या स्वरुपात भरत असतो. कोरोना महामारीच्या आर्थिक संकटानंतर शासनाने शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. शासनाने व स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत मंडई व आठवडे बाजार भरवला जात आहे. यामाध्यमातून नगरपंचायतीला लाखोंचा महसूल मिळतो. मात्र, त्यापटीत कोणत्याच सोयीसुविधा बाजारकरूंना मिळत नाही. ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना सुरक्षित बैठक व्यवस्था, ना शौचालय या अवस्थेत शेतकरी, महिला शेतकरी व व्यापाऱ्यांची अनेक महिन्यांपासून कुचंबणा सुरू आहे.
नगरपंचायतीने सुस्थितीत असलेले स्वच्छतागृह दोन वर्षांपूर्वी जमीनदोस्त केले. याठिकाणी नवीन स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. मात्र, स्वच्छतागृहाच्या कामास अद्याप मुहूर्त न मिळाल्याने याचा व्यापारी, शेतकरी व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून मगच कररूपी पावत्या शेतकरी व व्यापाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
(कोट)
सकाळी लवकर उठून मंडई व आठवडे बाजारसाठी यावे लागते. येथे आल्यानंतर कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने महिला, शेतकरी व आमची फार मोठी कुचंबणा होत असते. प्रशासनाने तातडीने या गंभीर विषयात लक्ष घालून शेतकरी, ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.
- महेश खडके, व्यापारी
(कोट)
स्थानिकांचा या बांधकामासाठी विरोध असल्याने काहीकाळ बांधकाम स्थगित होते. पोलीस बंदोबस्तात हे काम लवकरच सुरू करण्यात येईल. बाजारकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी
फोटो : ०२ शेखर जाधव
वडूज येथील जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले असून, या ठिकाणी निर्माण झालेला खड्डा धोक्याची घंटा देऊ लागला आहे. (छाया : शेखर जाधव)