डफळवाडी येथील शेतकरी धुळाराम शिंदे यांच्या स्वमालकीच्या जमिनीत असणारे पाणी गावगुंडांनी नेले आहे. तसेच लोखंडी पाईप आणि प्लास्टिक पाईपची तोडफोड केल्याने धुळाराम शिंदे यांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांच्या घरातील महिलांनी विचारणा केली असता अलका शिंदे-झोरे, पूजा शिंदे, धुळाराम शिंदे व यशोदा शिंदे यांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी गावगुंडांवर पोलिसांकडून कसलीच कारवाई झालेली नाही. धुळाराम शिंदे यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी. हक्काचे पाणी द्यावे आणि गावगुंडांवर कारवाई करावी, यासाठी धुळाराम शिंदे यांच्या शेतात त्यांच्या कुटुंबीयांनी जनावरांसह बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात लहान मुलांचाही समावेश आहे. आम्हांला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू. त्यानंतर कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष मारुती जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी धुळराम शिंदे, बापू शिंदे, सुरेश शिंदे, जोतिराम शिंदे, लक्ष्मी शिंदे, आनंदा शिंदे, यशोदा शिंदे, अलका शिंदे, आकाताई शिंदे, संगीता शिंदे, सुशीला शिंदे आदी आपल्या मुलांबाळांसह गुरेढोरे घेऊन उपोषणास बसले आहेत.
- चौकट
शेतकऱ्यांना गावातील गुंडांकडून नाहक त्रास दिला जात आहे. महिलांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित शेतकरी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलिसांकडून शेतकऱ्यांवरच फिर्याद देऊ नये, यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकू, असेही पोलिसांनी बजावल्याचे सांगितले जात आहे.
फोटो : ०९केआरडी०१
कॅप्शन : डफळवाडी, ता. पाटण येथील शेतकऱ्यांनी कुटुंब व जनावरांसह साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.