सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनय गौडा हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना शेतीची आवड आहे. साताऱ्यातील शासकीय निवासस्थानाच्या आवारातील पडीक जागेत त्यांनी भात रोपांची लागण केली आहे. विशेष म्हणजे चिखल करण्यापासून भाताचे तरवे रोवण्यापर्यत सर्व काम गौडा यांनी पुढाकार घेत पूर्ण केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले विनय गौडा हे अभियांत्रिकी पदवीधर असून गुगल ते प्रशासकीय सेवा असा त्यांचा प्रवास आहे. मूळचे कर्नाटक राज्यातील शेतकरी कुटुंबातील असलेल्या गौडा यांना शेतीची आवड आहे. त्यातच ते आता ज्या शासकीय निवासस्थानी राहतात तो परिसरात काही एकरांचा आहे. त्यामुळे येथील पडीक जागा त्यांनी वापरात आणली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी त्यांच्या बंगल्याचेही नुतनीकरण केले आहे. त्यांनी येथील पडीक जागाही वापरात आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार काम सुरू केले. शासकीय जागेत पिकवूनच आपल्या कुटुंबांसाठी भाजीपाला अथवा अन्य अन्नधान्याची गरज भागवायची, असा निर्धारच त्यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी निवासस्थान परिसरातील जागेत भाताचा तरवा टाकला होता. तो तयार झाल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी तयार झालेल्या भातरोपांची लावण केली. रोटाव्हेटरने चिखल तयार केल्यानंतर स्वत: गौडा चिखलात उतरले आणि हाती भाताची रोपे घेत स्वत: लागणही केली. यामध्ये त्यांना प्रतापसिंह शेती फार्म, आबा लाड, गजानन पिंपळे, राहुल बासल, संदेश कारंडे आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील काही शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाले.
फोटो दि. २१सातारा zp ceo photo
फोटो ओळ : सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शासकीय निवासस्थान परिसरात भात लागण केली.
.........................................................................