फलटण : व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दमदाटी केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध सावकारीचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद संजय नारायण शेंडे (वय ५३, रा. आनंदनगर, गिरवी नाका, फलटण) यांंनी दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, ११ नोव्हेंबर २०२० ते १३ मार्च २०२१ पर्यंत तहसीलदार कार्यालय परिसर फलटण व घरी आरोपी सोमनाथ हनुमंत इंगळे (रा. झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण) याने आठ हजार रुपये देऊन शेंडे यांच्याकडून व्याजाचे तेरा हजार रुपये रोख घेऊन उर्वरित व्याजाच्या रकमेच्या ४३ हजार रुपयांची वारंवार फोनवरून व समक्ष घरात घुसून मागणी केली. व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दमदाटी करून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब करत असल्याने सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.