खोदकामामुळे
वाहनधारकांची कसरत
सातारा : महाबळेश्वर-सातारा या मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने केळघर घाटातून वाहन चालविणे जिकिरीचे बनत आहे. खोदकामामुळे अपघाताची भीती व्यक्त होत असून, अनेक वाहनधारक आता साताऱ्याला येण्यासाठी मेढाऐवजी वाई मार्गे प्रवास करत आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
कोरोना संक्रमनामुळे
पर्यटकांची पाठ
महाबळेश्वर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर येथील बाजारपेठ तसेच ब्रिटिशकालीन पॉईंट पर्यटकांनी गजबजून गेले होते. रात्रीच्या वेळी बाजारपेठेत देखील पर्यटकांची वर्दळ दिसून येत होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मुख्य हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्याने व्यावसायिक व स्थानिकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनधिकृत थांब्यामुळे
अपघाताचा धोका
सातारा : कोरोनामुळे थांबलेली एसटीची चाके आता कुठे सुरळीतपणे रस्त्यावर धावू लागली आहेत. लांब पल्ल्याच्या एसटीबसमध्ये प्रवासी संख्या मर्यादित असल्याने या बसेस प्रवासाच्या आग्रहानुसार महामार्गावरील सेवा रस्त्यांवर थांबतात. सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असते. त्यातच अशा अनधिकृत थांब्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, परिवहन विभागाने एसटी बसेस सेवा रस्त्यावर थांबविण्यास निर्बंध घालावे, अशी मागणी होत आहे.
संवर्धनआभावी
फूलझाडे कोमेजली
सातारा : महामार्गावरील दुभाजकांमध्ये शोभेसाठी फूलझाडांची लागवड करण्यात आली आहे. लागवडीनंतर झाडांचे संवर्धन व संगोपन करणे गरजेचे होते. मात्र, महामार्ग विकास प्राधिकरणाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. झाडांची निगा राखली जात नसल्याने काही ठिकाणी फुलझाडे वाळून गेली असून, त्या जागी गवत व काटेरी झुडपे वाढली आहेत. संबंधित विभागाने झाडांची योग्य निगा राखावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.