आदर्की : बडेखान-घाडगेवाडी रस्त्यावरून ओव्हरलोड उसाची वाहतूक मुळीकवाडी गावातून होताना विद्युत तारा तुटणे, विद्युत खांब मोडून रस्त्यात पडणे, उसाच्या ट्राॅल्या पलटी होणे नित्याचे झाल्याने मुळीकवाडीत रोजच काळजाचा ठोका चुकत असून, उसाची धोकादायक वाहतूक बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फलटण-पुणे व फलटण-सातारा रोडला समांतर जोडणारा बडेखान-घाडगेवाडी रस्ता आहे. हा रस्ता मुळीकवाडी गावातून जाताना सी-कॉर्नर व तीव्र चढ आहे तर रस्त्यावर फक्त दहा फूट डांबर आहे, बाकी साइडपट्ट्या खचलेल्या आहेत. तर साइडपट्टीशेजारीच वीज वितरण कंपनीचे चार-पाच पोल, तारा आहेत. दिवसा ऊस वाहतूक होताना काही प्रमाणात सुरळीत होते. रात्रीची ऊस वाहतूक करताना ओव्हरलोड वाहतूक असल्याने वेग वाढलेला असताना अंधारात विद्युत तारा दिसत नसल्याने तारा उसाच्या ट्रॉलीत अडकून तुटतात आणि घर्षण होऊन ठिणग्या उडून वीजपुरवठा रात्रीचा खंडित होत असतो तर काही वेळा विद्युत पोल पडतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यवसाय व वीज कंपनीचे नुकसान होत आहे.
वीज वितरण कंपनी तात्पुरती उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करते; पण कारखाना व बांधकाम विभाग संबंधित रस्त्यासाठी उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. उपाययोजना करून धोकादायक ऊस वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.
(चौकट)
विद्युत खांबांना लोखंडी टेकू
ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळे तारा तुटण्याचे प्रकार होत असल्याने वीज वितरण कंपनीने चार-पाच विद्युत खांबाला लोखंडी टेकू देऊन तारा उंच घेण्याचे काम सुरू केले आहे.
08आदर्की01/02
फोटो - मुळीकवाडी (ता. फलटण) येथे पलटी झालेल्या ऊस ट्रॉल्या व मोडलेला विद्युत पोल.