लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, लसीकरणाने वेग घेतला आहे; परंतु लस घेताना अनेकजण संभ्रमात पडले आहेत. काहींच्या मते हदयरोग, ॲलर्जी असणाऱ्यांना लस झेपणार नाही पण वस्तुस्थिती वेगळीच असून, तज्ज्ञांच्या मते हदयरोग, ॲलर्जी असली तरी लस घ्यायलाच हवी, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
सातारा जिल्ह्यात गत दीड महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. सुरुवातीला या लसीसंदर्भात अनेकांच्या मनामध्ये संभ्रम होता. या लसीची रिॲक्शन येते, अशी अनेकांना धास्ती होती तर काहींच्या मते वेगवेगळे आजार व ॲलर्जी असल्यामुळे लस घेणे योग्य नाही; परंतु तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ही लस घेणे गरजेचे आहे. वेगवेगळे आजार असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असते. अशा रुग्णांसाठी ही लस जीवनदायी अशीच आहे; परंतु हदयरोग रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यावी, हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरविणे गरजेचे आहे. मनामध्ये कोणतीही शंका न बागळता आपल्या व आपल्या घरातल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. व्याधीग्रस्त लोक लस घेण्यात सर्वांत पुढे आहेत.
हृदयरोग असेल तर हृदयरोग तज्ज्ञांचा लस घेण्यापूर्वी सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ॲलर्जी असणाऱ्यांना रुग्णांनीही पूर्वीची ॲलर्जी असेल तर लस घेताना काळजी घ्यावी. अशा रुग्णांनी तज़्ज्ञांचा सल्ला घेऊन लस घ्यावी.
- डाॅ. सुभाष चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
हदयविकार असलेल्या रुग्णांनी खरंतर लस घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना हायपरटेन्शन, डायबेटिस आहे. अशा रुग्णांनी पण लस घेणे गरजेचे आहे. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत पण हृदविकार तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचाच आहे.
- निखील एकतपुरे
हृदयरोग तज्ज्ञ, सातारा
ज्या रुग्णांना एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असेल तर कोरोना लस घेणे शक्यतो टाळावे. ज्याची ॲलर्जी माहीत आहे तेव्हा अडचण येत नाही. पण कशाची ॲलर्जी आहे. हे माहीत नसेल तर अशा लोकांनी तज़्ज्ञांचा सल्ला घेऊन लस घेणे गरजेचे आहे.
- डाॅ. ज्ञानेश्वर हिरास
पॅथाॅलाॅजी तज्ञ, सातारा
डायबेटिस असलेल्या रुग्णांनी मनात कसलीही शंका न घेता कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. खरं ही लस अशा रुग्णांसाठीच तयार झालेली आहे. या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे लस घेतली तर धोका टळेल.
- डाॅ. चंद्रशेखर कारंजकर
वैद्यकीय अधिकारी, सातारा
अनेकांना लस घेताना वेगवेगळा अनुभव आलेला आहे. काहींना लस घेतल्यानंतर थंडी. ताप अशी किरकोळ लक्षणे जाणवू लागतात. अशावेळी घाबरण्याचे कारण नाही. लस घेण्यापूर्वी हालका नाष्टा करणे गरजेचे आहे तसेच औषधे सुरू असतील तर लस घेण्यापूर्वी कोणतीही औषधे घेऊ नये. एखाद्या रुग्णाला रिॲक्शन आल्यामुळे अनेकजण त्याचा बाऊ करतात. पण ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.