सातारा : सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असताना हातगाडीधारकांकडून संचारबंदी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अकरानंतरही बहुतांश ठिकाणी हातगाड्या सुरू ठेवल्या जात आहेत. प्रामुख्याने समर्थ मंदिर चौक व राजवाडा येथे हातगाड्यांची संख्या अधिक असून, येथील हातगाडीधारकांवर रविवारी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवांवर वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, दुकानदारांबरोबरच हातगाडीधारकांकडून नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. सकाळी अकरानंतरही बहुतांश ठिकाणी हातगाड्या सुरू ठेवल्या जात आहेत. प्रामुख्याने राधिका रोड, राजवाडा व समर्थ मंदिर चौकात हातगाडीधारकांची संख्या अधिक आहे.
या हातगाड्यांवर नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचाही फज्जा उडत आहे. वारंवार सूचना देऊन व कारवाई करून हातगाडीधारकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे रविवारी दुपारी पोलीस पथकाने समर्थ मंदिर चौकातील हातगाडीधारकांवर कारवाई केली. दुपारी उशिरापर्यंत येथील हातगाड्या सुरू ठेवण्यात आल्याने पोलिसांनी हातगाडीधकांची कानउघाडणी करून गाड्या तातडीने बंद केल्या.
(चौकट)
नो हॉकर्स झोन निश्चित करावा : सुहास राजेशिर्के
परळी खोरे व सातारा शहराला जोडणारा बोगदा-समर्थ मंदिर मार्गावर वाहनधारक व नागरिकांची सातत्याने रेलचेल सुरू असते. रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीधारकांनी बस्तान बसविल्याने ‘अतिक्रमण मोठे अन् रस्ते झाले छोटे’ असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. येथील हातगाडीधारकांमध्ये सातत्याने वादावादीचे प्रकारही घडत असतात. त्यामुळे हा परिसर नो हॉकर्स झोन करावा, अशी मागणी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी पालिका व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
(चौकट)
आम्ही झटतोय मग तुम्ही का फिरताय !
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे; परंतु पोलिसांनाही अनेकजण चकवा देऊ लागलेत. पोलिसांनी अडविल्यानंतर कोण मेडिकल, तर कोण दवाखान्याचं कारण पुढं करत आहेत. त्यामुळे हतबल झालेले पोलीस कर्मचारीही आता ‘तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही जिवाचं रान करतोय मग तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा ना’, अशी विनंती करू लागले आहेत.
फोटो : ०२ जावेद खान