म्हसवड : माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडीसाठी ९ व १० फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविण्यात आल्या आहेत. ९ फेब्रुवारीला ३३, तर १० फेब्रुवारीला २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडी पार पडणार आहेत. तहसीलदार बी. एस. माने यांच्या आदेशानुसार या निवडीचा कार्यक्रम होणार आहे.
माणमधील चौदा बिनविरोध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर उर्वरित सत्तेचाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका अतिशय चुरशीने पार पडल्या. निकालानंतर सत्तेबद्दल दावे-प्रतिदावे करण्यात आले; तर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर काही ठिकाणी ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी बहुमत मिळविलेल्या पॅनेलची अवस्था झाली; तर काही ठिकाणी सरपंचपद मिळविण्यासाठी घडलंय बिघडलंयची चर्चा सुरू आहे. आज सरपंच निवडीसाठीच्या विशेष सभांच्या तारखा तहसीलदार बी. एस. माने यांनी जाहीर केल्या.
९ फेब्रुवारी रोजी पर्यंती, शिंगणापूर, मार्डी, बोडके, वडगाव, इंजबाव, वाकी, श्रीपालवण, शिंदी खुर्द, शेवरी, बोथे, थदाळे, पळसावडे, गोंदवले बुद्रुक, वडजल, सुरुपखानवाडी, गटेवाडी, राजवडी, हवालदारवाडी, हिंगणी, खडकी, काळचौंडी, टाकेवाडी, तोंडले, गंगोती, पिंगळी खुर्द, रांजणी, गोंदवले खुर्द, कुकुडवाड, किरकसाल, सोकासन, पुकळेवाडी व मोही या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत.
१० फेब्रुवारी रोजी जांभुळणी, संभूखेड, शिंदी बुद्रुक, येळेवाडी, भालवडी, पिंपरी, वारुगड, कुळकजाई, जाशी, शिरवली, डंगिरेवाडी, देवापूर, धामणी, दिवडी, ढाकणी, हस्तनपूर, कारखेल, भाटकी, शेनवडी, भांडवली, मोगराळे, पानवण, पिंगळी बुद्रुक, वर म्हसवड, लोधवडे, वाघमोडेवाडी, राणंद व वळई या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत.
सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी राजकीय पक्षांनी हालचाली गत्मान केल्या असून, दगा फटका होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे.