सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झालेला आहे. रविवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ४५, नवजाला ६३ तर महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ४ दिवसांत ८ टीएमसीहून अधिक पाणी आले असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे.
जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. या पावसाने पश्चिम भागात मंगळवारपासून जोरात सुरूवात केली. कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वर, कोयनानगर आदी भागात हा पाऊस कोसळत होता. तसेच पश्चिमेकडील सर्वच धरण परिसरात पाऊस सुरू झाला. मात्र, बुधवारी सायंकाळपासून पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. जवळपास दीड दिवस पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले. तर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. कोयना धरणात सद्य स्थितीत ३९.७१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. मागील चार दिवसांत ८ टीएमसीहून अधिक पाणी धरणात वाढले. तर धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी धरणांमध्येही पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे.
रविवार सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ४५ तर जूनपासून आतापर्यंत ७७३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे ६३ व आतापर्यंत ८६९ आणि महाबळेश्वरला रविवार सकाळपर्यंत ६४ व यावर्षी आतापर्यंत ९७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यात किरकोळ स्वरुपात पाऊस झाला.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची आवश्यकता आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. मोठा पाऊस झाला तरच खरीप हंगामातील पेरण्या होणार आहेत.
चौकट :
जिल्ह्यात सरासरी ६ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरापासून रविवारी सकाळी १० पर्यंत सरासरी ६ तर आतापर्यंत २३५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी १० पर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी आहे. सातारा - ५ (२५२.०१), जावळी - २१.०६ (३९७.०८), पाटण - ७.०६ (३२७.०१), कऱ्हाड - ७.०९ (२७४), कोरेगाव -२.०५ (१६३.०७), खटाव -१.०५ (१११.०८), माण - ०.६ (७२.०५), फलटण - १.०२ (८२.०९), खंडाळा - ५ (१४२.०८), वाई - ९.०१ (२५३.०९) आणि महाबळेश्वर तालुका -८ (७०३.०९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
..........................................................