खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या वळणावर एक खाद्यतेलाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात दोघे जण जखमी झाले असून, खाद्यतेलाचे बॉक्स रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
घटनास्थळावरून व खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चिपळूण ते पुणे खाद्यतेलाची वाहतूक करणारा ट्रक (केए ०१ एके ४५१४) हा खंबाटकी बोगदा ओलांडून भरधाव वेगात लगतच्या वळणावर पलटी झाला. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून, गाडीतील खाद्यतेलाचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले. तेलाच्या पिशव्या सर्वत्र पसरल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मात्र, खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालक सुलेमान नदाफ (वय २५, रा. हुबळी) व क्लीनर शिवराज खर्डीमठ्ठ (वय ३५) हे दोघे जण जखमी झाले. दोघांनाही तत्काळ उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
--------------
०२खंडाळा
खंडाळा येथे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात ट्रक पलटी झाला.