सातारा : हिरवाई संस्थेच्या माध्यमातून यावर्षीही कातकरी व झोपडपट्टीमधील मुलांनी दिवाळीचा सोहळा साजरा केला. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असणारा हा दिवाळी सण गुलमोहर कॉलनी येथे प्रा. संध्या चौगुले यांच्या अंगणात साजरा झाला.हिरवाईशी जोडलेल्या या १००-१२५ लहान मुलांसोबत यावर्षी दुर्गळवाडीच्या प्राथमिक शाळेतील ५० मुले-मुली सहभागी झाली. कॉलनीतील लोकांनी सर्वांचे स्वागत केले. ताल आणि संगीताच्या पार्श्वभूमीवर डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, कवी अनिल कांबळे, अविनाश मोरे, डॉ. सुनीता पवार, डॉ. सुनंदा यादव, प्रा. संध्या चौगुले यांनी सर्व मुलांचे औक्षण करून अभीष्टचिंतन केले.मुलांनी सकाळपासूनच कॉलनीतील रस्ते झाडून स्वच्छता केली. सर्वांनी मिळून तो रांगोळ्यांनी सजवला. पांढरा, लाल, निळा, पिवळा, हिरवा, पोपटी अशा उत्साही रंगातून काळ्या डांबरी सडकेवर मोर, मासे, झाडे, पाने, फुले, डोंगर आणि चंद्रसूर्य जणू रस्त्यावर उतरले होते. या रांगोळ्यांच्यामध्ये असंख्य पणत्यांचा मंद प्रकाश फुलझाडांची रोपे आणि मुलांनी स्वत: बनवलेल्या आकाश कंदीलांची आरास भर घालत होती.चार वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या संस्कारातील मुले एकमेकांची ओळख करून घेत उत्साहाने एकत्रित दिवाळीचा आनंद लुटत होती. त्यांच्यातील स्नेहभाव, मैत्रीची देवघेव यातील सुंदरता वातावरणात दरवळत होती. यावेळी कातकरी व झोपडपट्ट्यांमधील मुलांनी, गुलमोहर व प्रसाद कॉलनी दुर्गळवाडीच्या मुला-मुलींनी ‘लेझीम’ सादर केली.या मुलांना दप्तर, पेन, वही, साबण याबरोबरच मिठाई व फळांची मेजवानी देऊन करण्यात आली. तक्षशीला शाळा, सातारा व जीवन शिक्षण विद्यामंदिर दुर्गळवाडी या दोन शाळांना मुलींसाठी १०० पुस्तकांची दिवाळी भेट दिली. (प्रतिनिधी)
‘हिरवाई’त साजरी झाली पर्यावरणपूरक दिवाळी
By admin | Updated: October 23, 2014 00:09 IST