लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : घरात पसारा झाला की़ सर्वांचीच चिडचिड होते, त्यातल्या त्यात गृहलक्ष्मीला हा पसारा आवरता आवरता नाकीनऊ येते. घरातला कचरा डस्टबीनमध्ये साठविण्याची चांगली सवय आता महिलांना लागलेली आहे. या डस्टबिनसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या इतस्ततः पडतात. साताऱ्यातील मेघना महेश कोकीळ या सहावीत शिकणाऱ्या मुलीने या पिशव्या साठवून ठेवण्यासाठी ‘वेस्ट रोल बॉक्स’ तयार केला आहे. संक्रांती सणानिमित्त महिलांना वाण म्हणून हे वेस्ट रोल बॉक्स व भाज्यांची रोपे देण्याचा संकल्प मेघनाची आई सुचिता महेश कोकीळ यांनी केला आहे.
कोकीळ कुटुंब येथील सैदापूरमध्ये राहते. आपल्या घराच्या अंगणात त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. मेघनाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद आहे. हा छंद तिने आपल्या दोन्ही भगिनी मृणाल व मधुरा यांनादेखील लावला आहे. प्रत्येक घरात कचरा साठविण्यासाठी कचरापेटी ठेवण्यात येते. कचरा बॉक्स खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये प्लास्टिकची बॅग लावण्यात येते. या प्लास्टिकच्या बॅगचा रोल बहुतांश लोकांच्या घरांमध्ये किचनमधील कट्ट्यात ठेवला जातो. अनेकदा आवराआवरी करताना या पिशव्या खाली पडतात. पुन्हा हा पसारा आवरावा लागतो. घरातील महिलांना हे नेहमीचेच काम झाले आहे.
हे ओळखून मेघनाने अतिशय सोप्या पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केली आहे. वापरून झालेली प्लास्टिकची भरणी अथवा बिसलेरीच्या बाटल्या कापून त्यामध्ये या पिशव्यांचे रोल ठेवण्यात आले आहेत. डस्टबिनच्या जवळपास सहजरीत्या या पिशव्या काढता येतील, अशा पद्धतीने ठेवता येतात. संक्रांती निमित्ताने महिला इतर महिलांना घरी बोलवून संक्रांतीचं वाण देतात. आता हेच बॉक्स महिलांना वाण म्हणून देण्याचा निर्णय कोकीळ कुटुंबाने घेतला आहे. महिलांच्या भाज्यांचा प्रश्नही मिटविण्यासाठी त्यांना टोमॅटो, वांगी यांची रोपे भेट दिली जाणार आहेत. प्लास्टिकचे ग्लास कापून त्यात माती साठवून त्यांनी ही रोपे तयार केलेले आहेत.
चौकट
पैशांची बचत.. अन् कलात्मकताही
वेस्ट कॅरिबॅग ठेवण्यासाठी बॉक्स असतो, त्यासाठी अडीशे ते तीनशे रुपये लागतात. महिलांनी असे बॉक्स घरच्या घरी केले तर हा खर्च वाचतो. मेघनाने कलात्मकता वापरून हे बॉक्स व भाजीपाल्यांच्या रोपांच्या कुंड्या तयार केल्या आहेत.
फोटो : ०९कोकीळ प्रूफ