वाई : येथील भद्रेश्वर पुलावर दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. हा अपघात शुक्रवारी झाला. अलका सुरेश सोनवणे असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, वाई तालुक्यातील ओझर्डे येथील अलका सुरेश सोनवणे (वय ५०) ह्या पतीसमवेत घर सामान घेण्यासाठी वाईला येत होत्या. यावेळी सुरुर-वाई रस्त्यावर भद्रेश्वर पुलावरून शहराकडे येत असताना त्यांच्या दुचाकी (एमएच ०२ बीयू ४४२४)ला डंपर (एमएच ११ सीएच ३६९३)ची पाठीमागून धडक बसली. यामध्ये डंपरच्या पुढील चाकाखाली येऊन त्या फरफटत गेल्या. त्यात अलका सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला अशी तक्रार पती सुरेश आनंदराव सोनावणे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे, तर प्रत्यक्षदर्शी काही साक्षीदारांनी सांगितले की पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे तयार झालेल्या गतिरोधकावरून जात असताना अलका दुचाकीवरून खाली पडल्या. त्या धक्क्याने त्यांच्या पतीची दुचाकी बाजूला पडली. पाठीमागून वेगात आलेल्या डंपरखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद झाली असून, वाई पोलीस तपास करीत आहेत.