पिंपोडे बुद्रुक : केवळ एका महिन्यात दोन वेळा दूध दरात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुळातच संक्रमण अवस्थेतून चाललेल्या दुग्ध व्यवसायात अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता असून दूध संस्था जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. सर्वसामान्य शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहे. अगदी बागायत शेतकऱ्यांपासून भूमिहीन शेतमजुरांपर्यंत सर्वांना उदरनिर्वाहासाठी हमखास पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मध्यंतरीच्या काळात दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले होते, त्यामुळे बेरोजगार युवकही या व्यवसायाकडे वळले होते. वाढत्या महागाईचा विचार करता दूधदरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या १ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच दूध संस्थांनी दुधाचा खरेदी दर कमी केला असून प्रतिलिटर चार रूपये कमी केले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी होऊन दुग्ध व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. ही स्थिती अशीच राहिली तर दूध दरातील घट आणि चाराटंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडणार आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
एकदम चार रूपये दर कमी करून दूध संस्थांनी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. हे योग्य नसून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. - जितेंद्र जगताप, दूध उत्पादक, रणदुल्लाबाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरच्या दरात झालेली घट आणि दूध संकलनात झालेली वाढ यामुळे अतिरिक्त दुधाचे करायचे काय, असा प्रश्न दूध संस्थांसमोर आहे. त्यामुळे दूध दरात कपात करणे अपरिहार्य आहे.
- डॉ. राजेंद्र महाडिक, दूध संकलनप्रमुख,
अनंत दूध मोठ्या प्रमाणावर दूध पावडर संस्थेकडे पडून राहत आहे. तसेच अतिरिक्त दूध संकलन होत असून ही परिस्थिती अशीच राहिली तर दर आणखी कमी होऊ शकतात. शासनाने निर्यातीवर २० टक्के अनुदान देणे अपेक्षित आहे.
- संजीवराजे नाईक-निंबाळकर, गोविंद दूध प्रकल्पप्रमुख