दहिवडी : माण हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. राजवडी, बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो. त्याच राजवडीत निसर्गाच्या कृपेमुळे सर्व बंधारे, तलाव, ओढेनाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील तलावाला धबधब्याचे स्वरूप आले. धबधबा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील तरुणवर्ग, लहान मुले गर्दी करत आहेत.या तालुक्यातील कित्येक गावांमध्ये पावसाळ्यातही ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू असते. त्यात कायमस्वरुपी दुष्काळी असणाऱ्या माण तालुक्यातील राजवडी गावात गतवर्षी खूप चांगला पाऊस झाला. गेल्या दहा वर्षांपासून तहानलेले परिसरातील सर्व तलाव, ओढे-नाले बंधारे भरून वाहू लागले. त्यातच गावच्या पूर्व दिशेस असणाºया पांडोबाचा कडा तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. सांडव्यावरून पडणाºया पाण्याने पुढे जाऊन धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले. अल्पावधीतच हा धबधबा पंचक्रोशीतील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गावचा धबधबा पाहण्यासाठी तालुक्यातील लोक गर्दी करू लागले आहेत. बालगोपाळांबरोबरच मोठ्यांनाही पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येत आहे.
दुष्काळी माणमध्ये धबाबा तोय आदळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:15 IST