सातारा : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहे. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, ही आपली भूमिका असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत शुक्रवारी (दि. २७) सह्याद्री अतिथिगृहात राज्य सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही; याबद्दल रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
राज्य सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकांना रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण का दिले जात नाही, याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून जाब विचारणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयम बाळगला पाहिजे; तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. नारायण राणे यांची यात्रा शिवसेनेला बघवली नाही. नारायण राणे जे बोलतात, ती शिवसेनेचीच भाषा आहे. सातारा, कऱ्हाड आरटीओ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी मिळाली पाहिजे, असेही मंत्री आठवले यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, किशोर गालफाडे उपस्थित होते.