सातारा : ‘आमच्या बहिणी व मुलींना समाजात वावरताना सुरक्षित वाटत नसेल तर आम्हाला वर्दी घालण्याचा अधिकार नाही,’ असे परखड मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांपासून नांगरे-पाटील सातारा दौऱ्यावर आलेले असताना ते मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते. नांगरे पाटील म्हणाले, ‘कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्ते सुरक्षित असणे गरजेचे आहे. हे दोन्ही रस्ते सुरक्षित असतील तर गुन्ह्यांवर नियंत्रण येते. त्यामुळे लोणावळ्यापासून कोल्हापूरपर्यंत प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत जादा असणारी वाहने पेट्रोलिंगसाठी वापरण्यात येणार आहेत. विशेषत: महामार्गावर सातत्याने क्राईम घडत असते. त्यामुळे दर दहा मिनिटाला पोलिसांची गाडी महामार्गावर दिसली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रयत्न होणार आहेत. तसेच ‘महामार्ग बीट’ ही संकल्पानाही लवकरच तयार करण्यात येणार आहे. महिला, युवतींवर अत्याचारात वाढ होत असून, महाविद्यालयाच्या परिसरात युवतींचे छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. हे प्रकार रोखण्याठी पाच अधिकाऱ्यांना कार्यशाळेसाठी पाठविण्यात आले आहे. ते लवकरच परतणार आहेत. ते आल्यानंतर एक टीम तयार करण्यात येणार असून, त्या टीमच्या माध्यमातून १०० महिला पोलिसांना प्रशिक्षण देणार आहे, असे सांगून नांगरे-पाटील पुढे म्हणाले, ‘शहरातील प्रत्येक महाविद्यालयाच्या ठिकाणी जाऊन सर्व्हे केला जाईल. महिला पोलिसांकडे छुपे कॅमेरेही दिले जाणार आहेत. या उपाययोजनांमुळे महाविद्यालय परिसरातील गुंडगिरी आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. औरंगाबादच्या धर्तीवर पोलिस शाळा उभी करण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांमधून झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. सध्या पोलिसांच्या मुलांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. काय म्हणाले नांगरे पाटील ४पर्यटनस्थळी गुंडगिरीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष देणार ४सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी पोलिस आहेत. ४तक्रारदारांना कंट्रोल रूममधून प्रश्न विचारण्यात येणार . ४पोलिस दलामध्ये वर्तवणूक आणि वागणुकीबाबत सकारात्मक पाऊल उचलणार . ४कार्यक्षमता आणि प्रतिमा सुधारण्यासाठी, सर्वसामान्यांना पोलिसांची भीती वाटणार नाही. ४गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असेल. ४चार्जशीट दाखल करताना कमतरता राहू नये यासाठी अधिकाऱ्यांनी सत्यनिष्ठता भूमिका घ्यावी. ४आयसिस, नक्षलवाद, दहशतवादाच्या प्रभावाखाली कोणीही येऊ नये यासाठी पोलिसांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ४अवैध व्यवसाय आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करून त्यांना पोलिस यंत्रणेचे भागीदार करणे गरजेचे. ४१५ आॅगस्टला ग्रामसभेत गावातील अवैध धंदे बंद व्हावेत, असा ठराव करण्यात येणार . ४सायबर क्राईमबाबत सर्व पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणी अद्ययावत लॅब करण्याचे काम प्रगतिपथावर ४साताऱ्यातील लॅबसाठी ६० लाखांचा निधी मंजूर. ४भविष्यात सायबर क्राईम पोलिसांसाठी मोठे चॅलेंज ४खासगी सावकारी करणाऱ्यांची तक्रार दाखल करावी. वाय. सी. कॉलेज समोर होणार पोलिस चौकी यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करणार असल्याची ग्वाही विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. येथील अलंकार हॉलमध्ये मंगळवारी सायंकाळी त्यांनी विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संवाद साधला. महिलांची सुरक्षा, अवैध्य व्यवसायावर नियंत्रण, औद्योगिक वसाहतींमध्ये सुरक्षा आदी विषयांवर यावेळी डॉ. हमीद दाभोलकर, राजेंद्र चोरगे, प्रकाश गवळी, राजेश कोरपे, धैर्यशील भोसले, प्राचार्या प्रतिभा गायकवाड, गुरुप्रसाद सारडा, योगेश सब्बरवार, इम्रान बागवान आदी उपस्थित होते. नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुुद्द्यांवर पोलिस प्रशासन काय करत आहे याची सविस्तर माहिती नांगरे-पाटील यांनी दिली. दरम्यान, जावळी तालुका दारू मुक्त करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असेही नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले. गोल्डनमॅनचा होणार बंदोबस्त ! शहरात अनेकदा फ्लेक्सवर गोल्डनमॅन झळकत असतात. अशा गोल्डनमॅनचा पोलिस आता पूर्व इतिहास तपासतील. तसेच बेकायदेशीर फ्लेक्सवर झळकलेल्या नावांची यादी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. फ्लेक्सवर सातत्याने झळकणाऱ्या गुंठेपाटीलांवरही पोलिसांची नजर असणार आहे. भयमुक्त वातावरणासाठी पोलिस दल सदैव प्रयत्नशील राहील. जिल्हाधिकारी अन् एसपींचा पुढाकार... तडीपार झालेल्यांची तडीपारी रद्द होऊ नये यासाठी चुका राहणार नाहीत, याची पोलिस काळजी घेतील. प्रतिबंधात्मक कारवाईबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेतील. तसेच शहरामध्ये वेळेवरच दुकाने बंद होतील. महाविद्यालयात स्वयंसेवी संस्थांच्या वतीने प्रशिक्षण, जनजागृती करण्यात येणार आहे. अत्याचारप्रकरणात काय शिक्षा होऊ शकते, याबाबतही माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक नागरिक गणवेशरहित पोलिस असल्याचेही नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दाभोलकर, पानसरे प्रकरणांचा तपास योग्य दिशेने दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येबाबत ‘सीआयडी’ योग्य दिशेने तपास करत आहे. लवकरच यातील काही महत्त्वाची माहिती मिळेल. अशा प्रकारच्या पुन्हा घटना घडू नये म्हणून प्रतिष्ठित लोकांना बंदोबस्त देण्यात आला आहे. यावर पोलिसांची बारीक नजर आहे. राजकारण्यांचा चांगल्यासाठी दबाव असावा ! राजकारणी लोक समाजामध्ये वावरत असतात. त्यामुळे लोकांची कामे त्यांना करावी लागतात. राजकारण्यांनी चांगल्या गोष्टीसाठी दबाव आणला पाहिजे, चुकीच्या गोष्टीसाठी दबाव आणणे अयोग्य आहे. पोलिसांनी निर्भयपणे काम करावे, असेही नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
... तर वर्दी घालण्याचा अधिकार नाही
By admin | Updated: July 27, 2016 01:04 IST