पिंपोडे बुद्रूक : जिल्ह्यात आंबा लागवड मोठया प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांना या बागेपासून आर्थिक फायदा होण्यासाठी तसेच झाडांचं आयुष्य दीर्घ काळ राहण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट ठेवून कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यामार्फत महागाव येथे कृषी प्रात्यक्षिक व चर्चा सत्राचे अयोजन करण्यात आले होते.
अलीकडील काळात आंबा पीकवाढीसोबत त्यात काही उपद्रवी किडींचा प्रादुर्भावसुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंब्याच्या खोड किडीचा उपद्रव दिसून येत आहे. खोडामध्ये अथवा मोठ्या फांदीमध्ये छिद्र पाडून ही कीड झाडाच्या गाभ्यापर्यंत पोहोचते. तेथेच प्रजनन वाढते. त्यानंतर अशा अनेक किड्यांमुळे झाडाचा गाभा निकामी होतो. कीड असलेल्या छिद्राबाहेर लाकडाचा भुसा बाहेर पडलेला दिसतो. अन्नद्रव्याअभावी झाड वाळून जाण्याचा धोका असतो. या किडीचा व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी सदरचा कृती प्रात्यक्षिकद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यावर प्रथमतः असे छिद्र मोठे करून त्यामध्ये तार खोचून कीड बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. तसेच छिद्रामध्ये चार मिलीलीटर क्लोरोपायरीफॉस टाकलेले द्रावण सिरीनजद्वारे झाडाच्या आत सोडावे. आंब्याच्या झाडावर रोग कीड ग्रस्त फांदाची छाटणी व सूर्यप्रकाश झाडांच्या आत मिळण्यासाठी मध्य फांदी विरळणी हे तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी आंब्यावर भिरुड किडीचे छिद्र आढळल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करावी,’ असे आवाहन कृषी विभागाचे फडतरे यांनी केले.
प्रात्यक्षिक व चर्चासत्रासाठी शेतकरी चांगदेव चव्हाण, नामदेव चव्हाण, सचिन चव्हाण, संकेत चव्हाण, निशांत माने, सूरज चव्हाण, तुषार चव्हाण, अक्षय चव्हाण व संतोष पन्हाळे आदी शेतकरी उपस्थित होते.