सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सांगावा घेऊन खासदार उदयनराजेंशी ‘जागेचा तह’ करण्यासाठी लक्ष्मणराव पाटील गुरुवारी सायंकाळी सातारच्या विश्रामगृहावर पोहोचले खरे; वीस मिनिटांच्या चर्चेनंतर लक्ष्मणतात्यांना ताटकळत ठेवून उदयनराजे थेट कऱ्हाडकडे रवाना झाले. तसेच आमदार बाळासाहेब पाटील हेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कऱ्हाडात ठाण मांडून बसलेले विधान परिषद सभापती रामराजे व आमदार प्रभाकर घार्गे यांची रणनीतीही निष्प्रभ ठरली. दरम्यान, एक दिवस उरलेला असताना गुरुवारीसुद्धा एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. राष्ट्रवादीतील पक्षाअंतर्गतचा तिढा अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत कायम राहिला. बारामतीकरांच्या फर्मानानुसार लक्ष्मणतात्यांनी स्वत: उदयनराजेंशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला. गुरुवारी सकाळपासूनच लक्ष्मणतात्या उदयनराजेंनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते; पण उदयनराजेंनी त्यांचे फोन स्वीकारले नाहीत. दुपार उलटून गेली तरी हा संपर्क काही केल्या होत नव्हता. अखेर पावणेपाचच्या दरम्यान हा संपर्क झाला. सायंकाळी सव्वापाच वाजता तात्यांनी विश्रामगृहावर येऊन उदयनराजेंशी कमराबंद चर्चा केली. लक्ष्मणतात्यांनी या बैठकीत उदयनराजेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही राष्ट्रवादीच्या पॅनेलसोबतच राहा,’ असा ज्येष्ठतेचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘मला बँकेतल्या तीन जागा पाहिजेत. बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला,’ असे सांगून उदयनराजे तडकाफडकी उठले. ‘एका लग्नासाठी मला जावं लागतंय, तुम्ही बसा, मी परत आलोच,’ असं म्हणून उदयनराजे विश्रामगृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर सुमारे अर्धा तास लक्ष्मणतात्या विश्रामगृहातील एका दालनात बसून होते. उदयनराजेंचे समर्थक नाना शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी काही काळ तात्यांशी गप्पा मारल्या. त्यानंतर वाट पाहून-पाहून ‘मी निघतो. उदयनराजे परतल्यानंतर मला फोन करा, परत भेटतो,’ असं म्हणून तात्या तिथून निघून गेले. दरम्यान, गुरुवारी सकाळी रामराजेंसह, लक्ष्मणतात्या, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, नागरी बँकेतील उमेदवार राजेश पाटील-वाठारकर यांनीही कऱ्हाडात आ. बाळासाहेब पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे उदयनराजे अन् बाळासाहेब यांच्याबाबतीतले दोन्ही प्रयत्न फोल ठरले.
चर्चा अयशस्वी; घमासानच !
By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST