सातारा : ‘गळ्यात अन् हातात मोठ-मोठ्या माळा घालणारे बुवा मंडळी आज खुशाल सांगत आहेत. पाच मुले जन्माला घाला, दहा मुले जन्माला घाला, असे वक्तव्य करणे म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाहीची थट्टा आहे. हे चुकीचे मार्गदर्शन समाजाला करण्याचे काम सुरू आहे. त्याचे कारण एकच ते म्हणजे, आम्हा हिंदूची लोकसंख्या वाढली पाहिजे. कसला हिंदू, कसला मुसलमान. हा शेवटी माणूस आहे. आणि भारतीय आहे. गौतम बुद्धांची विचारधारा जगाने स्वीकारली आहे. हिंदुत्वादाच्या मी विरोधात नाही; पण हिंदुत्वाच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण केले जात आहेत. हे देशाच्या आणि समाजाच्या हिताचे नाही,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. जकातवाडी येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोेधन संस्थेच्या वतीने ‘फुले -आंबेडकर साहित्य’ पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपराकार लक्ष्मण माने , अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी, शरद पवार यांच्या हस्ते विलास वाघ, रंगनाथ पठारे, संदीप जावळे, पुरुषोत्तम गायकवाड यांना ‘फुले-आंबेडकर साहित्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शरद पवार म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे काम भटक्या विमुक्त संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. लक्ष्मण माने यांनी चांगले काम केले आहे. मात्र, त्यामध्ये सातत्य पाहिजे. मध्येच काही तरी त्यांच्या डोक्यात भलतंच येतं, हे सगळं सोडून द्यावं; पण त्यांना हे सोडून कोण देतं, एकदा हातात घेतलेलं काम कोणत्याही परिस्थिती सोडता येत नाही. त्यातून माघारीही घेता येत नाही. बदल होतात. अन्याय होतात, अत्याचार होतात याची मला कल्पना आहे; पण त्यातून मार्ग काढायला पाहिजे. तुम्ही काय म्हणताय याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. तुम्ही काय करताय याच्याकडे आम्ही लक्ष देतो, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
हिंदुत्वाच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदभाव : शरद पवार
By admin | Updated: May 10, 2015 00:42 IST