ओगलेवाडी : कराड तालुक्यातील हजारमाची ग्रामपंचायत व लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आत्माराम शाळेत सदाशिव विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात अनेक लोक उपचार घेऊ लागले आहेत. याचा फायदा अनेक रुग्णांना मिळू लागला आहे. या विलगीकरण कक्षात उपचार घेऊन बरे झालेल्या ६ रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. पदाधिकारी व डॉक्टर यांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांना घरी सोडण्यात आले.
यावेळी उपसरपंच प्रशांत यादव, डॉ. अनिकेत पालसांडे, डॉ. आनंद पवार, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ काळे, अवधूत डुबल, दीपक लिमकर, गणेश घबाडे, आमदार रोहितदादा पवार विचार मंचचे जिल्हा अध्यक्ष समीर कुडची, धनंजय राजमाने, आस्मा तासगावकर, सूरज वाघमारे, सुदेश मोरे, सदाशिव साळुंखे, कृष्णात काळे, सतीश डावरे, गणेश यादव, विजय भोसले आदी उपस्थित होते.
या विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या सर्व रुग्णांना नाष्टा, जेवण व औषधोपचार पूर्ण मोफत देण्यात येत आहे. गावातील ज्या रुग्णांना घरी राहून उपचार घेण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून देण्यात आला आहे. मात्र, लहान घर आणि एकत्र कुटुंब यामुळे जागेचा प्रश्न यामुळे घरी राहून ते उपचार घेऊ शकत नव्हते, अशा रुग्णांसाठी सदाशिव विलगीकरण कक्ष खरंच आधार ठरत असल्याचे मत बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केले.
गावातील गोरगरीब बाधितांना या केंद्रात योग्य उपचार मिळावेत, यासाठी डॉ. अनिकेत पालसांडे व डॉ. आनंद पवार हे विलगीकरण कक्षातील रुग्णांना विनामूल्य सेवा देत आहेत. विलगीकरण कक्षात आतापर्यंत १० बाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अजूनही दोन रुग्ण उपचारात आहेत. गरीब बाधितांसाठी हा विलगीकरण कक्ष आधार ठरतो आहे, यामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी हातभार लागत आहे.
फोटो- ओगलेवाडी- बरे झालेल्या रुग्णांना गुलाबपुष्प देताना, प्रशांत यादव, डॉ. अनिकेत पालसांडे, डॉ. आनंद पवार व अन्य.