कऱ्हाड : ‘राज्यातलं सरकार अस्थिर होऊ नये, म्हणून भाजपला बाहेरून पाठिंबा दिलाय़ पण आम्ही जातिवाद्यांबरोबर हातमिळवणी केली असा अपप्रचार काँग्रेसवाले करीत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तो खोडून काढला पाहिजे़,’असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.कऱ्हाड येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते झाला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी खासदार विजयसिंह मोहिते, लक्ष्मणराव पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, नरेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़ अजित पवार म्हणाले, ‘विरोधात असताना नुसतं बोलणं सोपं असतं़ आम्ही टोल, एलबीटी रद्द करू म्हणणारे आज शब्द फिरवताहेत़ ‘विक्रांत’ युध्दनौका संग्रही ठेवणार म्हणणाऱ्यांच्या हातात सत्ता असताना आज ती भंगारात का चालली आहे , याचा जाब आता लोकांनी विचारला पाहिजे़.’ आमदार शशिकांत शिंदे, नितीन भरगुडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी प्रास्ताविक केले़ मानसिंगराव जगदाळे, सादिक इनामदार, दत्ता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले़ (प्रतिनिधी)
काँग्रेसचा अपप्रचार खोडून काढा
By admin | Updated: November 23, 2014 23:51 IST