खंडाळा : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. त्यामुळेच गावागावांत इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका बॅलेट मशीनद्वारे होणार असल्याने लोकांपर्यंत प्रचार कसा पोहोचवायचा, असा प्रश्न नेत्यांसह कार्यकर्त्यांना पडला आहे. पण, यावर उपाय म्हणून बाजारात डमी मशीन उपलब्ध झाल्या असून, आता गावोगावी बझर ऐकु येत आहे.ग्रामपंचायतीसाठी एका वार्डात एका पॅनेलचे तीन उमेदवार असतात. यापूर्वी वार्डातील तिन्ही उमेदवारांना वेगवेगळ्या रंगांच्या चिठ्ठ्या देऊन एक निवडणूक चिन्ह दिले जायचे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना आमक्या रंगाच्या चिठ्ठीवर या चित्रांवर शिक्का मारा ‘असा’ प्रचार करणे सोपे जायचे. मात्र, प्रशासनाच्या सोयीसाठी लोकसभेपासून सर्वत्र निवडणुका बॅलेट मशीनद्वारे घेण्यास सुरुवात झाली. त्याचे लोन आता ग्रामपंचायतीपर्यंत येऊन पोहोचले आहे. वार्डातील उमेदवार एकाच बॅलेटवर असणार आहेत. बॅलेटवरच रंगांच्या स्ट्रीपवर उमेदवारांची नावे छापून बटण दाबायचे. परंतु मतदाराने एकाच उमेदवाराचे बटण दोनदा किंवा तीनदा दाबू नये, यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी डमी मशीनद्वारे प्रचार करणे अधिक सोयीचे जावे, यासाठी काही तरुण उद्योजकांनी या मशीन बाजारात उपलब्ध केल्या आहेत. मशीन खरेदीसाठी उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले. एका मशीनवर तीन उमेदवारांना मतदान कसे करणार, असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. (प्रतिनिधी)
थेट संपर्क ‘डमी मशीनद्वारे’
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST