ढेबेवाडीः शासनाचे आदेश गुंडाळून विनाकारण भटकंती करून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला. यामुळे ढेबेवाडी-तळमावले येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आहे. ढेबेवाडी-तळमावले या कोरोना हाॅटस्पाॅटकडे वाटचाल करणाऱ्या विभागात रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट आणि भटके गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.
ढेबेवाडी विभागात दररोज नऊ ते दहा कोरोना बाधित सापडत आहेत. मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत काही बेजबाबदार घटक तयार नाहीत. अगदी लाॅकडाऊन जाहीर केला तरीही बेधडक भटकणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ढेबेवाडी पोलिसांनी दांडक्याचा प्रसाद देऊन, आर्थिक दंड वसूल करून, वाहने काढून घेणे असे अनेक कडक उपाय करून पाहिले; पण ढेबेवाडी-तळमावले म्हणजे कोरोनातील प्रेक्षणीय स्थळे असल्यासारखे समजून काही तरी खोटीनाटी कारणे सांगून सुटका करून घ्यायची आणि पोलिसांना कसे गंडवले, या आपल्या हुशारीवर आपणच खूश होऊन कोरोना काळात मिळालेला वेळ व लाॅकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेत फिरत होते. आपण कोरोना वाहकाचेच काम करीत आहोत याचे भान या भटक्यांना नव्हते.
राज्य शासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. ढेबेवाडी पोलिसांनी सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने राबविलेल्या या मोहिमेत ६३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गुढे, भोसगाव, उधवणे, बनपुरी येथील प्रत्येकी एक बाधित सापडले.
चौकट..
विनाकारण भटकंतीचा आजार बरा झाला...
पोलीस, आरोग्य, स्थानिक कोरोना दक्षता समित्या, पोलीस पाटील असे अनेक घटक कामाला लावून, लाॅकडाऊन जाहीर करून अनेक बंधने शासनाने आणली. विभागातील तमाम व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःहून दहा दिवस बाजारपेठ बंद ठेवून जनता कर्फ्यू जाहीर केला. मात्र, या भटक्यांना याचे गांभीर्य व काही देणे-घेणे नव्हते म्हणून शेवटी पोलिसांनी वरील उपायाचा अवलंब केला. ही मात्राबरोबर लागू पडली आणि विनाकारण भटकंतीचा आजार बरा झाल्याचे चित्र समोर आले आहे.
२४ढेबेवाडी
ढेबेवाडी-तळमावले या कोरोना हाॅटस्पाॅटकडे वाटचाल करणाऱ्या विभागात रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट आणि भटके गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.