सातारा : ‘ रासप हा केवळ धनगरांचा पक्ष नाही. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. पण, ते दहा दिवसांत मिळत नसते. मुख्यमंत्री, पंतप्रधान आरक्षणासाठी पॉझिटिव्ह आहेत. घाईगडबडीने आरक्षणाचा ठराव करून दिल्लीला पाठवला तर तो निगेटिव्ह येईल. मराठा आरक्षणाची जशी अवस्था झाली, तशीच धनगर आरक्षणाचीही होईल. त्यामुळे आम्ही जपून पावले टाकत आहोत,’ अशी माहिती राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्य उद्योग मंत्री महादेव जानकर यांनी दिली. जिल्हा नियोजन बैठकीनंतर त्यांनी अनौपचारिकपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘रासप केवळ धनगरांचा पक्ष आहे, असले ब्रॅँडिंग प्रसार माध्यमांंनी थांबवावे,’ अशी विनंती त्यांनी सुरुवातीला केली. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षित प्रवर्गांप्रमाणेच मराठा व ब्राह्मण समाजाच्या परीक्षार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने मुख्यमंत्र्याकडे केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हेही यासाठी आग्रही होते. आमच्या मागणीला यश आल्याने आता ही वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे,’ असे त्यांनी सांगितले.पुढील धोरणांविषयी विचारल्यानंतर मंत्री जानकर म्हणाले, ‘आज आम्ही मित्र पक्ष होतो. राजकारणात डोकी मोजली जातात. भाजपने आम्हाला शब्द दिला होता, तो आम्हाला मंत्रिपद देऊन निभावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मी त्याबाबत आभार मानतो.संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे. सातारा जिल्ह्यात रासप पॉझिटिव्ह नाही. कार्यकर्त्यांची बांधणी सुरू आहे. आरटीआय कार्यकर्ता मला आवडत नाही. केवळ शेखर गोरे पॉझिटिव्ह आहेत. मातीचं आणि आईचं प्रेम आहे. पण, सातारा जिल्ह्यानं मला काही दिलं नाही. चळवळ, चळवळ करून वळवळ करणारी माणसे मला नकोत. त्यामुळे रासप तालुकाध्यक्षांच्या निवडी करणार आहेत,’ असेही यावेळी मंत्री जानकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शेखर गोरे मरेपर्यंत माझ्यासोबतच..‘शेखर गोरे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे,’ या प्रश्नावर ‘नाही अजिबात नाही. शेखर गोरे माझ्यासोबत मरेपर्यंत राहणार आहे. त्यांचे स्वत:चे कर्तृत्व आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते ही त्यांच्यामुळे मिळाले आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना आम्ही आमदार करणार, यापुढे महाराष्ट्रात रासपचे ३० आमदार असतील,’ असेही महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक करणार..माझ्या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर अधिकारी जातील. गायीच्या दुधाला जास्त दर मिळेल. खात्याच्या माध्यमातून तीन विद्यार्थी डेन्मार्कला डेअरी डेव्हलपमेंटच्या प्रशिक्षणासाठी पाठविले आहेत. मला खात्री आहे की आगामी काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. दुग्ध, पशुसंवर्धन व मत्स्य विभागाकडे महाराष्ट्रभर जागा भरपूर आहेत. या जागांचं योग्य नियोजन केले तर घराघरात शेतकऱ्यांची मुलं उद्योजक बनतील,’ असेही जानकर म्हणाले.
धनगर समाज आरक्षण आस्ते-आस्ते !
By admin | Updated: July 16, 2016 23:30 IST