वरकुटे-मलवडी : कोरोनाचा कहर सुरू असतानाच त्यात वादळ-वारा आणि पावसाची भर पडल्याने वातावरण दूषित झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दररोज सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येत असल्याने अचानक उष्णता कमी होऊन गार वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत माण तालुक्यातील ढाकणी येथे सिंगल फेज व थ्री फेजच्या बिघाडामुळे वीजपुरवठा सतत खंडित होत असून, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बहुतांश लोक घरीच बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणे गरजेसाठी जास्त वेळ सुरू ठेवावी लागत आहेत. त्यातच अचानक वीज गायब होत असल्याने ग्राहकांची विशेषतः महिला वर्गाची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याच्या विहिरीत भरपूर पाणी असूनसुद्धा लाईट नसल्याने नळांना पाणी सोडण्यात असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ५०० लोकसंख्या असलेल्या बेघर वसाहतीतील आबालवृद्धांना एक किलोमीटरवर असणाऱ्या शिंदे वस्तीवरून पिण्याचे पाणी भरावे लागत आहे, तर पथदिवे बंद असल्याने ऐन उन्हाळ्यात गावभर अंधार पसरत असून साप, विंचू यांपासून ग्रामस्थांना धोक्याचा संभव आहे.
ढाकणी गावातील एखादा विजेचा खांब सोडला तर बहुतांश खांबांवर तारा सदानकदा लोंबकळत असलेल्या निदर्शनास येतात. किमान कोरोनाकाळात तरी महावितरणने विस्कळीतपणा आलेल्या कारभारात सुधारणा घडवून आणून, विजेमुळेे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करावी; अन्यथा महावितरणच्या दारातच उपोषण करणार असल्याचा इशारा ढाकणीचे सरपंच दत्ताभाऊ शिंदे यांनी दिला आहे.
(कोट)
बिल थकले की, ग्राहकांना धारेवर धरले जाते. ढाकणीतील विजेचे खांब, तारा कुठेही व्यवस्थित नाहीत. विजेअभावी पाणीपुरवठा बंद झाला आहे. नागरिकांना एक किलोमीटरवरून पिण्याचे पाणी भरावे लागत आहे. कोरोनाकाळात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे; अन्यथा ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपोषण केले जाईल.
- दत्ताभाऊ शिंदे, सरपंच, ढाकणी