लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: रिअॅक्शनच्या तक्रारी समोर येत असल्याने अनेकजण लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. यादीत नाव असूनही ऐनवेळी लस नको रे बाबा, असे आरोग्य कर्मचारी म्हणत आहेत.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. लस घेणे हे ऐच्छिक असल्यामुळे अनेकांनी सुरूवातीला उत्सुकतेपोटी लस घेण्यासाठी यादीत नाव समाविष्ट केले. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्षात लस घेण्याची वेळ आली. तेव्हा मात्र, बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी ऐनवेळी माघार घेतली. केवळ दुसऱ्याला रिअॅक्शन आल्याचे पाहून त्यांनी लस न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हा प्रशासन मात्र, लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून, कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन करत आहे.
८७० जणांना रोज लस दिली जात आहे.
१८,००० जणांना आतापर्यंत लस दिली.
२५,००० हजार जणांना लस देणे अपेक्षित आहे.
चौकट : रिअॅक्शन काय?
लस दिल्यानंतर अनेकांना भोवळ आणि ताप येण्याची लक्षणे दिसून आली. परंतु काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली. कोणताही दुष्परिणाम झाला नाही. जिल्ह्यात पहिल्या दिवशी तिघांना किरकोळ रिअॅक्शन आली. परंतु नंतर त्यांची प्रकृती चांगली झाली.
चौकट : लस घेण्यासाठी येऊ लागल्या अडचणी
१) मी लस घेण्यासाठी नावनोंदणी केली होती. परंतु माझ्या मित्राला लस घेतल्यानंतर थोडी रिअॅक्शन आली. त्यामुळे मी ऐनेवळी लस घेतली नाही. पण पुढच्या यादीत मी लस घेणार आहे.
(आरोग्य कर्मचारी)
२) लस घेतल्यानंतर राज्यात अनेकांना रिअॅक्शन आली. हे समजल्यामुळे मी नाव नोंदणी केली नाही. परंतु रोज रुग्णालयातच काम करत असल्यामुळे खरं तर लस घेतली पाहिजे, असं आता वाटतंय.
-आरोग्य कर्मचारी
३) लस घेणार आहे. परंतु अजून कोणावर लसीची रिअॅक्शन होते का? हे मी पाहणार आहे. त्यानंतरच लस घेणार आहे. आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी लस घेतली आहे. त्यामुळे मीपण दुसऱ्या टप्प्यात लस घेणार आहे.
-आरोग्य सेवक
४) आठ महिने कोरोनाच्या काळात वॉर्डमध्ये काम केले. परंतु अद्याप तरी कोरोनाची लागण झाली नाही. बघू लस घ्यायची की नाही. हे अद्याप ठरवले नाही. यादीत नाव दिलं होतं. पण घरातल्यांनी लस घेऊ नको, असं सांगितले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही.
-आरोग्य सेवक
५) सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी लस देण्यासाठी नाव नोंदणी केली. परंतु त्यातील सहा ते सातजणांनी लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यांनी लस घेतली नाही म्हणून मी पण घेतली नाही. डॉक्टरांमध्येही लस घेण्यावरून संभ्रम आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या मनामध्येही लसीबाबत शंका वाटतेय. पण काही दिवसांत आम्ही लस घेणार आहोत.
-सफाई कर्मचारी
कोट : कोरोना प्रतिबंध लस ही अत्यंत गरजेची आहे. कोरोना झाल्यानंतर बघू लस घेऊ, असं चालत नाही. लस घेतल्यानंतर दीड महिन्यात प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाची लागण होण्यापूर्वीच लस घेणे गरजेचे आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
डॉ. सुभाष चव्हाण- जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा