सातारा : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर यासह सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. अशी भयानक परिस्थिती असताना सातारा पालिकेकडून नागरिकांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नाही. कोरोनाचा कहर सुरू असताना पालिका सुस्त का बसून आहे, असा प्रश्न उपस्थित करून पालिकेने किमान आयसोलेशन वॉर्ड तरी सुरू करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि उपचारांअभावी रुग्ण दगावत आहेत. होम आयसोलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण असून त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. शासनाने चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च करावेत, अशा सूचना पालिकेला दिल्या आहेत. रहिमतपूरसारख्या छोट्या नगरपालिकेने तेथील नागरिकांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले असून अगदी बेड, लाइट व्यवस्था, ऑक्सिजनसह सर्व सुविधा या सेंटरसाठी या पालिकेने दिल्या आहेत. रहिमतपूरसारखी छोटी पालिका नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत असेल, तर शासनाने सूचना देऊनही सातारासारखी मोठी अ वर्ग नगरपालिका थंड का पडली आहे, हा खरा प्रश्न आहे. सातारा शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
अशा वेळी पालिकेने काहीतरी सुविधा देणे अपेक्षित होते. सातारा शहर आणि आसपासच्या परिसरात मोठमोठी मंगल कार्यालये आहेत. पालिकेचे स्वत:चे मंगल कार्यालय आहे. अशा ठिकाणी रुग्णांसाठी किमान आयसोलेशन वाॅर्ड तरी पालिकेने सुरू केल्यास त्याचा सातारकरांना फायदा होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. पालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांचे पती डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. पती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पदावर आहे, याचा फायदा नगराध्यक्षांनी सातारकरांना करून द्यायला हवा, असेही पत्रकात नमूद केले आहे.
(चौकट)
उदयनराजेंनीच लक्ष घालावे
खासदार उदयनराजेंनीच आता या प्रश्नात लक्ष घालावे. तुमच्याशिवाय पालिका प्रशासन आणि नगरसेवक हलणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी करा आणि सातारकरांसाठी पालिकेमार्फत एखादी तरी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खा. उदयनराजे यांच्याकडे केली आहे.