पाटण पंचायत समितीची सभा गुरुवारी सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेमध्ये सभापती राजाभाऊ शेलार सुरुवातीलाच म्हणाले की. सभापतींसह पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रम पुन्हा सुरू करणार असून यादरम्यान ग्रामसेवक असो अथवा बांधकाम विभागाचे अधिकारी असो. कुणीही कामचुकारपणा करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करणार आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत चौदाव्या वित्त आयोगातील पैसे विकास कामावर खर्च केले नाहीत तर ग्रामसेवक आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
पाटणच्या शिक्षण विभागात ४३ केंद्रे असून त्यावर देखरेख करण्यासाठी फक्त बारा केंद्रप्रमुख आहेत. त्यासाठी तालुक्यातील पात्र पदवीधर किंवा वरिष्ठ मुख्याध्यापक यांच्यावर केंद्रप्रमुख कामाची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी चर्चा सदस्य संतोष गिरी आणि सभापती यांनी केली. आरोग्य विभागाचे काम मंद चालले असून तालुक्यातील एकूण तेरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली पाहिजे, अशी अपेक्षा सभापती राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केली. तालुक्यातील २१ हजार ४६९ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले, अशी माहिती यावेळी सभेत देण्यात आली.
इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांसाठी शिकवणाऱ्या ७२४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी सहा शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या शाळा निर्जंतुकीकरण करण्यात आल्या असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी बोरकर यांनी दिली.
- चौकट
उपसभापती अभियंत्यांवर भडकले
मत्रेवाडी येथे नवीन नळ योजना राबवली गेली आहे. या योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. दोन दिवसाआड पाणी मिळत आहे. याबाबत उपसभापती प्रतापराव देसाई यांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता कदम यांना जाब विचारला. संबंधित गावाचे ग्रामस्थ कदम यांचेकडे गेले असता तुमचे प्रश्न लेखी द्या, असे सांगून गेले चार महिने कदम टोलवाटोलवी करत होते.
- चौकट
एकीकडे सभा सुरू असताना दुसरीकडे पंचायत समिती सदस्य विलास देशमुख हे चक्क पशु वैद्यकीय विभागात बराच वेळ गप्पा मारत बसले होते आणि तेथूनच सभेची मजा बघत होते. त्यांना काही काळ आपण लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी येथे आलो होतो, याचे भान नव्हते. अखेर बऱ्याच वेळानंतर त्यांनी आपली पावले सभेकडे वळवली.