लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोलिसांकडे असलेली ई-चलन मशीन चालती फिरती बँक बनली असून, या मशीनमधून वर्षभरात तब्बल ३ कोटी ३ लाख ४ हजार ५०० रुपयांचा दंड वाहन चालकांना करण्यात आलाय. मात्र, हा दंड वाहन चालकांनी अद्याप भरला नसून, दंडाच्या स्वरूपात दिलेले हे ‘कर्ज’ वाहन चालकांना एक ना एक दिवस फेडावेच लागणार आहे.
पोलिसांच्या हातात पूर्वी पावती पुस्तक असायचं. या पुस्तकावरच पोलिसांचा महसूल ठरलेला असायचा. वाहन चालकांना दंडाची रक्कम भरल्यानंतर पावती दिली जात होती. या पावतीचा धसका अनेकांना असायचा. मात्र, काळाच्या ओघात पोलिसांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी ई-चलन मशीन आलं. मशीन नवी, तसे या मशीनचे नियमही नवेच. वाहन चालकाने दंडाची पावती जागेवरच न भरण्याची सूट म्हणे या मशीनने दिली. पर्याय म्हणून या मशीनने वाहन चालकांच्या मोबाईलवर दंडाची रक्कम पाठविण्याची मुभा दिली. ही मुभाच आता पोलिसांची डोकेदुखी ठरू लागलीय. अनेक वाहन चालक दंड केल्यानंतर जागच्या जागी दंड भरत नाहीत. बघू, पुन्हा कधी तरी भरू, असे म्हणून वेळ मारून नेतायेत. त्यामुळे अनपेड दंडाच्या रकमेचा फुगा दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: सर्वाधिक कारवाया या महामार्गावर झालेल्या आहेत. एकट्या भुईंज टॅप पोलिसांकडे असलेली दंडाची आकडेवारी बरेच काय सांगून जातेय. विविध प्रकारचा दंड न भरलेल्या वाहनांवर पोलिसांनी २ कोटी ९१ लाख ७२ हजारांचा दंड केला आहे, तर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर तब्बल ११ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड केलाय. या दोन्ही कारवायांतून ३ कोटी ३ लाख ४ हजार ५०० रुपयांची थकबाकी दिसून येत आहे. म्हणजे दंडाच्या रूपात का होईना, पोलिसांनी वाहन चालकांना ‘कर्ज’ दिले आहे. आता हे कर्ज वसूल करण्याच्या वेगळ्याच पद्धती समोर आल्या आहेत. यदाकदाचित पुन्हा तेच वाहन पोलिसांच्या कचाट्यात सापडले, तर मागचा दंड भरल्याशिवाय गाडी सोडायची नाही, असा म्हणे नियम आहे. त्यामुळे ही थकीत रक्कम पूर्णपणे वसूल होण्यास किती वर्षांचा अवधी लागेल, हे पोलीसही सांगू शकत नाहीत.