सातारा : जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये मृत कोंबड्या आढळल्या असून, बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत; तर शिरवळ व ओझर्डेमधील मृत कावळे आणि फलटण तालुक्यातील मोराच्या अहवालाची आता प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत, तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या परिसरातील ४७९ कोंबड्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मारून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती; तर कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असतानाच गुरुवारी जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये काही मृत कोंबड्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित विभागाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आले आहेत. आज, शनिवारपर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शिरवळ येथील मृत दोन आणि वाई तालुक्यातील ओझर्डेमधील एका कावळ्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या अहवालाची अजुनही प्रतीक्षा आहे. तर गुरुवारी (दि. २१) फलटण तालुक्यात मोराचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याचेही नमुने भोपाळला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.
.......................................................