गुलाब पठाण किडगावसातारा तालुक्यातील नेले हे गाव राजकीय दृष्ट्या संदेवनशील समजले जाते. गावात २००६ मध्ये स्मशानभूमी शेड बांधण्यात आले, मात्र २०१० मध्ये वेण्णा नदीला आलेल्या पुरात शेड वाहून गेले आहे. त्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाळ्यात रात्रभर जागून अंत्यविधी करावा लागत आहे.नेले हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. अत्यंविधी करण्यासाठी गावाला चांगली स्मशानभूमी असावी, यासाठी २००६ मध्ये शेड उभारण्यात आले होते. मात्र, वेण्णा नदीला आलेल्या महापुरात शेड वाहून गेले. आता उरले आहेत ते लोखंडी खांब आणि चबुतरा. या घटनेनंतर नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळावी, यासाठी पंचायत समितीला प्रस्ताव दिला. पण गेली चार वर्षे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात चबुतऱ्याचा अग्निसंस्कारासाठी वापर होतो. पण पावसामुळे रात्रभर तेथेच थांबावे लागते.शासनदरबारी पडलेल्या प्रस्तावावरील धूळ झटकून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्मशानभूमी शेड उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रात्रभर जागून करावा लागतोय अंत्यविधी-स्मशानभूमीच्या मरणयातना...
By admin | Updated: August 11, 2014 23:31 IST